लोकसत्ता वार्ताहर

कराड : ‘लाडकी बहीण’ ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातील कल्पना. त्याला मुख्यमंत्र्यांचे नाव दिले गेले, तर अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसहाय्य दिले असून, या योजनेवरून महायुतीत कोणताही वाद नसल्याचा दावा राज्याचे कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केला. लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजारावरून थेट दुप्पट तीन हजार करण्यासाठी महायुती शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

कराडमध्ये मंत्री खाडे पत्रकारांशी बोलत होते. खासदार शरद पवारांनी व्यक्त केलेल्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या शंकेबाबत विचारले असता खाडे म्हणाले, विरोधकांना बोलायला काय जाते? फुसका बार काढायचा, जनतेत गैरसमज पसरवायचा, असे सुरूच असते. त्यावर विश्वास ठेवू नये.

आणखी वाचा-खंडाळ्यात अल्पवयीन मुलाचा बालिकेवर अत्याचार

लाडकी बहीण योजनेबद्दलचे अजित पवारांचे फलक सामान्य कार्यकर्त्यांनी लावलेत ते अजित पवारांनी लावलेले नाहीत. ही योजना महायुतीची. त्यातील तिघांचीही आणि जनतेसाठीच आहे. या योजनेतून महिलांना पहिल्यांदा तीन- तीन हजार रुपये दिले असून, अजूनही देत आहोत. देणार आहोत, ही योजना बंद होणार नाही. उलट त्यातील रकमेत दुप्पटीने वाढ करण्यासाठी महायुतीचे शासन प्रयत्नशील असल्याचे खाडे यांनी सांगितले.

भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून कराडला उद्योग आणण्यासाठी सकारात्मक असल्याचे स्पष्ट करताना, कराडला उद्योगांना सर्व सुविधा मिळत असतील, तर तासवडे औद्योगिक वसाहतीत उद्योग आणण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.