पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग विद्युतीकरण आणि वैभववाडी-कोल्हापूर, हातकणंगले-इचलकरंजी, फलटण-पंढरपूर, जेऊर-आष्टी रेल्वेमार्गाची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंचित घटक व शेतकऱ्यांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या विकास कार्यक्रमाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे विशेष सुविधा पुरवणार आहे. कंटेनर कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून शेतमाल साठवणुकीसाठी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी वेअर हाऊस उभारले जातील. आणि यासाठी रेल्वे खाते पुढाकार घेणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
कराडनजीक समर्थ बहुउद्देशीय सभागृहात पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी मध्य रेल्वे आणि पॉवर ग्रीड कार्पोरेशनबरोबर स्वाक्षरी करार, घोरपडीच्या वॉटर रिसायकलिंग प्लान्टचे लोकार्पण, वैभववाडी-कोल्हापूर, हातकणंगले-इचलकरंजी, फलटण-पंढरपूर आणि जेऊर-आष्टी या नवीन रेल्वेमार्गाचा पायाभरणी सभारंभ रेल्वेमंत्र्यांनी व्हिडीओ लिंकद्वारे केला, त्या वेळी ते बोलत होते.
रेल्वेचे सर्व मार्ग ब्रॉडगेज करण्याबरोबरच रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येईल. रेल्वेने उभारलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून ३०० कोटी रूपयांची बचत होईल. रेल्वे जलसंधारणाच्या कामाबरोबरच ५ कोटी झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेईल, अशी माहिती देताना, रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, की सर्वसामान्यांच्या विकासात पायाभूत सुविधांचे योगदान मोलाचे राहते. रेल्वे ही पर्यावरणपूरक स्वस्त वाहतूक सेवा आहे. रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीसाठी विशेष सुविधा पुरवण्याबरोबरच शेतमालाच्या साठवणुकीसाठी ठिकठिकाणी वेअर हाऊसची उभारणी करण्यात येणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांच्या पायाभरणीचा शुभारंभ झाला असून, तो पायाभूत सेवांच्या विकासाचा भाग असल्यामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र या दोन स्वतंत्र विभागांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रदेशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. या रेल्वे प्रकल्पांमुळे किनारपट्टीचा भाग अन्य राज्यांशी जोडला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल कोकणात जाणार असून, शेतमालाला नवी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. कोकणातील शेतमालही अन्य बाजारपेठांना सहज उपलब्ध होण्याची ही सोय असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
राज्याचे कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, की सुरेश प्रभू यांच्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळाली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र रेल्वेने जोडला जाणार असल्याने या दोन्ही विभागातील व्यापाराला चालना मिळेल. त्याचा फायदा थेट राज्यातील शेतकऱ्यांनाही होणार आहे. दरम्यान, सुरेश प्रभू यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कराडच्या प्रीतिसंगमावरील समाधीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, संजय पाटील,विनायक राऊत, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे,भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ.अतुल भोसले, नीता केळकर आदींची उपस्थिती होती.