साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचा शुभारंभ
देशात रेल्वेच्या विकासाला गती देण्याबरोबरच महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी १ लाख ३६ हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू आहेत, राज्यात रेल्वेचे जाळे वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगतानाच रेल्वेच्या सर्वागीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत देशातील भाविकांना चारिधाम यात्रेला जाता यावे व त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वेने या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज शिर्डी येथे बोलताना दिली
शिर्डी रेल्वे स्थानकावर विविध उपक्रमाचे उद्घाटन तसेच साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचा शुभारंभ शिर्डी रेल्वे स्थानकावर प्रभू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोजगार हमी योजना आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्षा योगिता शेळके, खासदार सदाशिव लोखंडे, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.
प्रभू म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. प्रवाशांना स्वस्तात पिण्याचे पाणी, रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. देशभरातून लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. त्यांच्यासाठी विविध सुविधा दिल्या पाहिजेत. त्यासाठीच रेल्वेच्या माध्यमातून शिर्डी येथे अनेक सोई सुविधांच्या उभारणीवर भर देण्यात येत आहे. जीवनामध्ये चारधाम यात्रा यशस्वी व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते यासंदर्भातही रेल्वेने सर्वेक्षण सुरू केले असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
रेल्वेच्या कार्यपद्धतीत मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आला असल्याचे सांगताना प्रभू म्हणाले, रेल्वे विभागात आलेल्या प्रत्येक पत्र, निवेदनाची दखल घेतली जाते. जे काम होण्यासारखे आहे ते तत्काळ मार्गी लावले जाते तर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गतीने प्रयत्न केले जातात. यावर्षी ८१० कोटी लोकांनी रेल्वेने प्रवास केला असून, एका दिवसाला अडीच ते तीन कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने सोईसुविधांच्या वाढीवरही भर देण्यात येत आहे. लेह लडाख रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरु केले असून रामेश्वरम ते अयोध्या ही नवीन गाडी सुरु करण्यात आली आहे. तीन वर्षांत २ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचा शुभारंभ शिर्डी रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडी दाखवून करण्यात आला. पादचारी पूल, फलाट क्रमांक २, वॉटर वेिडग मशिन, स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यात सुधारणा, साईनगर शिर्डी आणि सोलापूर विभागातील इतर मोठय़ा स्थानकावर रोकडरहित कामकाज, सोलापूर विभागातील महत्त्वाच्या स्थानकावरील २० वॉटर व्हेडिंग मशिनचे लोकार्पण तसेच साईनगर शिर्डी स्थानकावरील प्रवासी सुविधा कामांचा शुभारंभ करण्यात आला.
महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी प्रास्ताविक केले. खासदार सदाशिव लोखंडे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, नागरिक, प्रवाशी उपस्थित होते.