‘काका मला वाचवा’, हे वाक्य आपण वाचलं आहे, तशीच वेळ माझ्यावर आली आहे, दादा मला वाचवा असं म्हणायची वेळ माझ्यावर आली आहे, असं वक्तव्य ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी केलं आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच सुरेश वाडकर यांनी हे वक्तव्य केलं. नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे अजित पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत चौथा सुविचार गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना सुरेश वाडकर यांनी अजित पवारांकडे एक मागणी केली.
सुरेश वाडकर म्हणाले, “नाशिकमध्ये अनेक प्रतिभावान मुलं आहेत. गाणं शिकण्यासाठी या क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी नाशिकहून अनेक मुलं मुंबईला येतात. प्रत्येकाला मुंबईला येणं, राहणं शक्य होत नसल्यामुळे नाशिकमध्ये एक संगीत शाळा काढावी अशी माझी इच्छा आहे. माझा तसा अट्टाहास होता. त्यामुळे मी इथे जागा घेत होतो. परंतु, मला जागेचं व्यवहारज्ञान नसल्याने माझी फसवणूक झाली आहे. दादाला (अजित पवार) हे सगळं माहिती आहे. त्यामुळे दादाने मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांना दम दिला. दादा दमाशिवाय कुणालाच दमात घेत नाही.” सुरेश वाडकर बोलत असताना मंचावर उपस्थित असलेले अजित पवार म्हणाले, “मला या प्रकरणाची माहिती आहे.”
गायक सुरेश वाडकर म्हणाले, संगीत शाळा काढण्याचं माझं स्वप्न आहे. माझं ९० टक्के काम झालं आहे. उरलेलं १० टक्के काम का होत नाही हेच मला कळत नाही. हे काम रखडलंय आणि तेच माझं दुःख आहे. इथे चांगली शाळा झाली असती आणि मी आवडीने ती शाळा स्वतः सांभाळली असती. मला याबाबतीत छगन भुजबळ यांनीसुद्धा माझी खूप मदत केली आहे. अजित पवार यांनी ही गोष्ट मनावर घेतली तर नक्की माझं काम होईल. मी इथे चांगली संगीतशाळा सुरू करेन अशी माझी खात्री आहे.
हे ही वाचा >> ‘राम मांसाहारी होता’, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवार गटाकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले…
सुरेश वाडकर दोन्ही नेत्यांना उद्देशून म्हणाले, मुंबईतली माझी शाळा पाहिली तर तुम्हीदेखील खूश व्हाल. त्यामुळे मी तुम्हा दोघांना (भुजबळ-पवार) विनंती करतो मला यातून वाचवा. जसं ‘काका मला वाचवा’ म्हटलं गेलंय, तसंच ‘दादा मला वाचवा’ असं म्हणायची वेळ माझ्यावर आली आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ नक्की माझं स्वप्न पूर्ण करतील, अशी ग्वाही मी त्यांच्याकडून आज मागेन.