महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून हीप बोन या आजाराने त्रस्त आहेत. पुण्यातील एका सभेतून त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर आज (मंगळवार) सकाळी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गजानन काळे यांनी सांगितलं की, “मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर आज सकाळी लीलावती रुग्णालयात यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली. लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली.” राज ठाकरे यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

हेही वाचा- विधान परिषद निवडणूक: “शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पडणार”, रवी राणा यांचा खळबळजनक दावा

खरंतर, राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून काल मुंबईत महाआरती आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मनसेच्या महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजनही करण्यात आलं होतं.

हेही वाचा- मतदानाच्या दिवशीच भाजपा नेते बावनकुळेंनी अजित पवारांची घेतली भेट; राजकीय चर्चांना उधाण

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द
दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि अयोध्या दौरा यामुळे राज ठाकरे चर्चेत आले होते. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदाराने राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. उत्तर प्रदेशमध्ये यायचे असेल तर अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागा अशी मागणी या भाजप खासदाराने केली होती. त्यानंतर माझा दौरा अयशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता.