मुंबई : सुघटनशल्य शस्त्रक्रियेतील बारकावे डॉक्टरांना कळावे, त्यामध्ये अधिकाधिक डॉक्टर पारंगत व्हावेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांना देशातील सर्वोत्कृष्ट सुघटनशल्य तज्ज्ञांकडून आपले ओबडधोबड, बसके, चपटे नाक व्यवस्थित करून त्याचे सौंदर्य वाढवण्याची संधी मिळावी यासाठी जी. टी. रुग्णालयामध्ये अनेक वर्षांपासून सुघटनशल्य प्रशिक्षण देण्यात येते. मात्र करोनामुळे मागील दोन वर्षांपासून बंद झालेले हे प्रशिक्षण यंदा पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी झालेल्या प्रशिक्षणामध्ये आठ नागरिकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
हेही वाचा >>> मुंबई विमानतळावर दहशतवादी कारवायांचा इशारा ; सहार पोलिसांकडून गुन्हा दाखल
ओबडधोबड, बसके, चपटे नाक, चेहऱ्याचा आकार, हनुवटी यावर शस्त्रक्रिया करून अनेकजण आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भर टाकत असतात. मात्र ही शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना परवडत नाही. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेसंदर्भातील प्रशिक्षण डॉक्टरांसाठी आर्थिकदृष्ट्या खर्चिक असते. त्यामुळे देशातील सर्वोत्कृष्ट सुघटनशल्य तज्ज्ञांमार्फत सर्वसामान्यांवर मोफत शस्त्रक्रिया व्हावी आणि डॉक्टरांना प्रशिक्षण मिळावे यासाठी जी. टी. रुग्णालयाने मागील अनेक वर्षांपासून सुघटनशल्यसंदर्भात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र करोनामुळे मागील दोन वर्षांपासून या प्रशिक्षणात खंड पडला होता. मात्र नुकतेच जी. टी. रुग्णालयातील सुघटनशल्य विभागाचे प्रमुख डॉ. नितीन मोकल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा या प्रशिक्षणाला सुरूवात झाली. या प्रशिक्षणामध्ये यंदा दोन दिवसांमध्ये आठ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष व दृकश्राव्य माध्यमातून घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये देशभरातून जवळपास १३७ डॉक्टर सहभागी झाले होते. यामध्ये मुंबई, हैदराबाद, नवी दिल्ली, गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यातील डॉक्टरांचा समावेश होता. यावेळी जी. टी. रुग्णालयाचे सुघटनशल्य विभाग प्रमुख डॉ. नितीन मोकल, नायर रुग्णालयाचे सुघटनशल्य विभाग प्रमुख डॉ. उदय भट, हिंदुजा आणि लिलावती रुग्णालयातील सुघटनशल्य विभागाचे सल्लागार डॉ. मिलिंद वाघ, केईएम रुग्णालयातील डॉ. कपिल अगरवाल, नवी दिल्लीतील मेदांता रुग्णालयातील सुघटनशल्य विभागाचे सल्लागार प्रा. डॉ. आदित्य अगरवाल यांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे सुघटनशल्य विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत घरवाडे यांनी दिली.
हेही वाचा >>> एक एकरवरील पुनर्विकास : म्हाडाला घरे की अधिमूल्य? दीड वर्षानंतरही धोरण नाही; अनेक प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत
जी. टी. रुग्णालयामध्ये २०१२ पासून सुघटनशल्य प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र करोनाकाळामध्ये दोन वर्षे प्रशिक्षण बंद होते. मात्र यावर्षी पुन्हा प्रशिक्षण सुरू करण्यात आले. यावेळी सुघटनशल्यातील सर्व बारकावे, नियोजन, मूल्यांकन, शस्त्रक्रियेचे तंत्र आणि इतर बाबींचे मार्गदर्शन डॉक्टरांना करण्यात आले. – डॉ. नितीन मोकल, सुघटनशल्य विभागप्रमुख, जी. टी. रुग्णालय