केंद्र व राज्याकडून ‘लॉयड’ची पाठराखण
एटापल्ली परिसरातील ५४ गावातील गावकऱ्यांची नेमकी मागणी काय आहे, याची साधी दखलही न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सूरजागड प्रकरणी लॉयड मेटल्सची तळी उचलून उत्खनन होणारच, असे जाहीर केल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे सूरजागड आंदोलन पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हे आहेत.
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथे नक्षलवाद्यांनी २३ डिसेंबरला ७८ वाहने जाळल्यानंतर हंसराज अहीर यांनी मंगळवारी पोलिस अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत, तर लगेच बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे याच अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली. सूरजागड संदर्भात गावकऱ्यांचे गैरसमज दूर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देतांनाच तेथे कुठल्याही परिस्थितीत उत्खनन होणारच, असे स्पष्ट निर्देश देऊन या परिसरात आवश्यक सुरक्षा पुरविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या दोघांचीही भूमिका लॉयड मेटल्स व्यवस्थापनाला पोषक असल्याचे दिसत असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. सूरजागड येथे लोहखनिजांचे उत्खनन करतांना सर्वप्रथम तेथे लोखंडावर आधारित उद्योग सुरू करा, अशी मागणी स्थानिकांनी कित्येक दिवसांपासून लावून धरलेली आहे. मात्र, याकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाल्याने नक्षलवाद्यांनी ही जाळपोळ केल्याचे स्पष्ट असतांनाही राज्य व केंद्र सरकार गावकऱ्यांच्या मागणीकडे का दुर्लक्ष करीत आहेत, हा प्रश्न आहे. त्यामुळे हा सूरजागड प्रश्नावरून तीव्र आंदोलन भडकण्याचीच चिन्हे आहेत.
तिकडे लॉयड मेटल्सने या प्रकरणात सुरुवातीपासून अतिशय चुकीची भूमिका घेतल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा पोलिस दलाला विश्वासात न घेता व गावकऱ्यांना न जुमानता कंपनीने अतिशय चुकीच्या पध्दतीने लोहखनिजाचे उत्खनन करून त्याची वाहतूकही केली. जहाल नक्षलवादी कमांडर साईनाथ या सर्व घडामोडींवर लक्ष्य ठेवून असतांनाच लॉयड मेटल्सने त्याचाच जवळचा नातेवाईक इरसा उसेंडी याला सुपरवायझर म्हणून सूरजागडला ठेवले. हा योगायोग कसा, असाही प्रश्न या बैठकीत विचारण्यात आल्याची माहिती आहे. याचाच अर्थ, कंपनीने या परिसरातील अनेक असामाजिक तत्वांना सोबत घेतले होते, ही वस्तुस्थिती आहे. नक्षलग्रस्त भागात कुठलेही काम करतांना सर्वप्रथम पोलिस व जिल्हा प्रशासनाला विश्वासात घ्यावे लागते. मात्र, येथे कंपनीने सर्व कामे स्वमर्जीने केली. लॉयड व्यवस्थापनाच्या अशा कारभारामुळे चक्रावलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी लॉयडच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. दरम्यान, आता हा उद्योगाला सुरक्षा देण्याचे निर्देश अहीर यांनी देताच गावकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी सर्वप्रथम या गावकऱ्यांच्या मागण्या जाणून घ्यायल्या हव्या होत्या.
नक्षलवाद्यांची पत्रकबाजी
सूरजागड घटनेला आठवडाही व्हायचा असतांना नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री गट्टा जांबिया या गावात या प्रकल्पाला प्रखर विरोध करण्यारी बरीच पत्रके वितरित केली. गट्टा पोलिस ठाण्यापासून २०० मिटरवरील वन विभागाच्या कार्यालयासमोर ही पत्रके सापडली. यात सूरजागडला विरोध करा, सूरजागड प्रकल्प पुन्हा सुरू होऊ देऊ नका व लॉयड मेटल्ससह या भागात येणाऱ्या प्रत्येक लुटारू उद्योगाला हाकलून लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पोलिसांनी ही सर्व पत्रके जप्त केली आहे, तर एटापल्ली पोलिस ठाण्यात जहाल नक्षलवादी नर्मदाक्का व साईनाथसह ७ नक्षलवाद्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.