नक्षलवादी चळवळीचा ५०वा स्थापना दिन २३ ते २९ मे या कालावधीत साजरा करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरो गडचिरोली भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)ने करताच ‘लॉयड मेटल्स’ कंपनीने नक्षलवाद्यांचे आवाहन धुडकावून सूरजागड येथील लोह उत्खननाचे काम सुरू केले आहे. कडक पोलीस सुरक्षा बंदोबस्त व सीसीटीव्ही कॅमेरे लावून काम सुरू करण्यात आल्याने नक्षलवाद्यांच्या वर्तुळात कमालीची अस्वस्थता असल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २६ जवान शहीद झाल्यानंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवरील तणावपूर्ण शांतता बघता सूरजागड येथील उत्खनन बंद करण्यात आले होते. वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा उत्खनन सुरू होईल, हे तेव्हाच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, वातावरण शांत होण्याऐवजी भामरागड तालुक्यातील कोपर्सीच्या जंगलात नक्षल व पोलिसांमध्ये चकमक झाली. त्यानंतर भूसुरुंगविरोधी वाहनात बसून जवान परत येत असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात एक जवान शहीद तर २३ जवान गंभीर जखमी झाले. त्यामुळे अतिदुर्गम भागातील परिस्थिती आणखीच बिघडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड मेटल्सच्या पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तेव्हाच सूरजागड येथील लोह उत्खनन पूर्ववत सुरू होण्याचे संकेत मिळाले होते. तीन दिवसांपूर्वी लॉयड मेटल्सने सूरजागड येथे लोह उत्खनन सुरू केले आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री भूमिपूजन करीत असताना भामरागड, एटापल्ली व अहेरीत सूरजागड उत्खननाला तीव्र विरोध झाला. या वेळी एटापल्लीत कडकडीत बंद पाळून सूरजागड बचाव संघर्ष समितीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यामुळे आता सूरजागड येथील उत्खनन विलंबाने होईल असे बोलले जात होते. मात्र, कडक पोलीस सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अतिरिक्त पोलिस बलाच्या बळावर पुन्हा सूरजागड येथे उत्खनन सुरू झाले आहे. दररोज सूरजागड येथून २० ट्रक लोह चंद्रपूरच्या लॉयड मेटल्स या कारखान्यात आणण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान लॉयडचे उत्खनन सुरू होत नाही तोच नक्षलवाद्यांनी २३ ते २९ मे या कालावधीत नक्षल सप्ताह पाळून नक्षल चळवळीची ५० वा स्थापन दिन धूमधडाक्यात साजरी करण्याचे आवाहन केले आहे. सूरजागड प्रकल्पासंदर्भात नक्षलवाद्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली असताना लॉयड व्यवस्थापनाने पुन्हा उत्खनन सुरू करून एक प्रकारे नक्षलवाद्यांना आव्हान दिले आहे. यामुळे गडचिरोलीत पुन्हा एकदा हिंसासत्र आरंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.