लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या पहिल्याच यादीत स्थान पटकावून खासदार दिलीप गांधी यांनी सर्वानाच धक्का दिला. हा त्यांनाही धक्काच असल्याचे मानले जाते. मात्र त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याने नगर लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अन्य कोणी रिंगणात उतरले तरी गांधी आणि राष्ट्रवादीचे राजीव राजळे अशी दुरंगी लढत रंगण्याचीच चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीकडून राजळे यांची उमेदवारी पूर्वीच निश्चित झाली होती, त्याची अधिकृत घोषणा गुरुवारी दुपारी झाली. भाजपने रात्री उशिरा दिल्लीत देशातील ५४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात महाराष्ट्रातील १७ उमेदवारांचा समावेश असून या पहिल्याच यादीत गांधी यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नगर मतदारसंघातील पक्षीय लढत पहिल्याच टप्प्यात निश्चित झाली आहे. गांधी यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी शहरात जोरदार जल्लोष केला. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही आतषबाजी सुरू होती. गांधी गुरुवारी नगरलाच होते. उमेदवारी जाहीर होताच समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली. पेढे वाटून या वेळी उमेदवारीचा आनंद व्यक्त करण्यात आला.
आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही नगर लोकसभा मतदारसंघात चाचपणी सुरू आहे. मात्र त्यांची येथील राजकीय ताकद लक्षात घेता त्याचा निवडणुकीवर फारसा प्रभाव पडणार नाही. त्यामुळे राजळे-गांधी अशीच दुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. दहा वर्षांनंतर या मतदारसंघात दुरंगी लढत होईल, त्यामुळेच निकालाबाबत आत्तापासूनच उत्सुकता व्यक्त होते. गेल्या वेळी (सन २००९) येथे राजळे यांनीच अपक्ष रिंगणात उतरून निवडणूक तिरंगी केली होती. त्याचा फायदा गांधी यांनाच झाला. गांधी (भाजप), आमदार शिवाजी कर्डिले (राष्ट्रवादी) आणि राजळे (अपक्ष) अशा तिरंगी लढतीत गांधी यांनी बाजी मारली. राजळे यांनी त्या वेळी तब्बल १ लाख ५९ हजार मते घेतली होती. त्याआधी (सन २००४) या मतदारसंघात तुकाराम गडाख (राष्ट्रवादी) आणि प्रा. ना. स. फरांदे (भाजप) अशी दुरंगी लढत झाली होती, त्यात राष्ट्रवादीने झेंडा फडकावला. या पाश्र्वभूमीवर येत्या निवडणुकीकडे लोकांचे लक्ष आहे.
सन २००४ मध्ये केंद्रात मंत्री असताना गांधी यांची उमेदवारी कापण्यात आली होती. याहीवेळी पक्षांतर्गत विरोधकांनी उमेदवारीचा जोरदार दावा केल्याने गांधी यांच्या उमेदवारीबाबत ती जाहीर होईपर्यंत अनिश्चितताच होती. ते उमेदवारीचा दावा करीत होते तरी त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल अशी स्थिती होती. त्यामुळेच नगरची उमेदवारी अखेरच्या टप्प्यात जाहीर होईल असाच सर्वाचा अंदाज होता. स्वत: गांधी यांनाही त्याची जाणीव होती. मात्र पहिल्याच टप्प्यात उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनाही धक्का बसला आहे, मात्र तो कमालीचा सुखद आहे. अन्य इच्छुकांच्या दृष्टीने मात्र ‘जोर का झटका लगेचच लगे’ अशीच स्थिती आहे. मात्र तरीही अंतर्गत नाराजी, शिवसेनेशी नगर शहर व पारनेरमध्ये ताणले गेलेले संबंध या पाश्र्वभूमीवर गांधी यांची आता सर्वार्थाने कसोटी ठरेल. दुरंगी लढतीला ते प्रथमच सामोरे जात आहेत, हाही भाग त्यात आहे. 

Story img Loader