गडचिरोली जिल्हय़ातील आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना आता राज्य शासनाप्रमाणेच केंद्र सरकारच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ मिळणार आहे. यात अडीच ते दीड लाखाच्या आर्थिक मदतीपासून रोजगार, स्वयंरोजगार व प्रशिक्षणाच्या कालावधीत चार हजार रुपये मानधनसुध्दा देण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी चळवळीने ग्रस्त आहे. त्यामुळे नक्षलवादाची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या योजना पूर्णत: वेगळ्या असून, एखाद्या नक्षलवाद्याने पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले तर त्याला या दुहेरी योजनेचा लाभ मिळणार आहे. आत्मसमर्पित नक्षल सदस्याची राज्य शासनाव्दारे निर्देशित केलेली समिती ओळख पडताळणी करेल. यापूर्वीच आत्मसमर्पण केलेले नक्षल सदस्य किंवा अंमलबजावणी होत असलेल्या पुनर्वसन योजनेखाली लाभ घेतलेले आत्मसमर्पित नक्षल सदस्य या योजनेनुसार लाभार्थी म्हणून पात्र ठरतील. नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचा सदस्य, विभागीय समिती सदस्य, केंद्रीय समितीचा सदस्य यांना अडीच लाख रुपये आणि त्या खालील मध्यम व कनिष्ठ स्तराच्या नक्षल दलममध्ये काम करणाऱ्या सदस्यांना दीड लाख रुपये आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. ही रक्कम संबंधितांच्या नावाने तीन वर्षांसाठी बँकेत जमा ठेवण्यात येईल. तीन वर्षांनंतर आत्मसमर्पित नक्षलवाद्याला ती बँकेतून काढता येईल. बँकेकडून स्वयंरोजगारासाठी तारण म्हणून या रकमेचा उपयोग केला जाऊ शकतो. नक्षल सदस्याने शस्त्रासह आत्मसमर्पण केल्यास योजनेत शस्त्राच्या वर्गवारीनुसार निर्धारित अतिरिक्त बक्षिसाची रक्कम त्याला देण्यात येईल. ही रक्कमसुध्दा बॅंक खात्यात तीन वर्षांसाठी ठेवण्यात येईल.
आत्मसमर्पितांना पुनर्वसन शिबिरात ठेवून स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल. ते जास्तीत जास्त ३६ महिन्यापयर्ंतच्या कालावधीसाठी असेल. ज्या अधिकाऱ्यांसमोर नक्षल सदस्य आत्मसमर्पण करतील त्यांना त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करून पुढील कार्यवाहीसाठी विहित माहिती, आत्मसमर्पण व पुनर्वसन अधिकाऱ्याकडे पाठवतील. या योजनेचा जास्तीत जास्त आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी लाभ घ्यावा आणि मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पण योजनेचा प्रचार करण्यात आल्याने गेल्या काही वर्षांंत आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना या योजनेचे महत्त्व पोलिसांनी पटवून दिले. केंद्राच्या योजनेचा नक्षलवादी निश्चित त्याचा लाभ घेतील, असा विश्वास पोलीस दलाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा