करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरातील सुरक्षेची पाहणी मंगळवारी पोलीस व बॉम्बशोध पथकाने केली.आपत्कालीन परिस्थितीत काम कसे करावे लागेल, याचे प्रात्यक्षिक बॉम्बशोध पथकाने केले. अचानक सुरू झालेल्या या प्रात्यक्षिकामुळे भाविक संभ्रमित झाले होते. दिवसातून तीनदा हे पथक मंदिराची कसून पाहणी करणार आहे.
बोधगया येथे शनिवारी बॉम्बस्फोटाची मालिका घडली होती. या पाश्र्वभूमीवर महालक्ष्मी मंदिरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. त्या दिवशी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयवंत खाडे यांनी मंदिरास भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली होती. तथापि पोलीस व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मात्र मंदिराकडे फिरकले नव्हते. सोमवारी टोलविरोधी कृती समितीने टोलविरोधातील महामोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाच्या सुरक्षेमध्ये वरिष्ठ अधिकारी व्यग्र होते. हा मोर्चा काल शांततेत पार पडला. त्यानंतर आज वरिष्ठ अधिकारी महालक्ष्मी मंदिरात दाखल झाले.
जिल्हाधिकारी राजाराम माने व पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी मंदिरात येऊन सुरक्षा व्यवस्थेची कसून पाहणी केली. सुरक्षेमध्ये कसूर राहू नये याबाबतच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. तर सायंकाळी बॉम्बशोध पथक मंदिरात दाखल झाले होते. बॉम्ब शोधण्याचे प्रात्यक्षिक या पथकाने केले. त्यांच्या गतिमान हालचाली पाहून भाविकही काही काळ संभ्रमित झाले होते. सुरक्षेची चाचणी सुरू असल्याचे समजल्यावर भाविकांमधील गैरसमज दूर झाला. श्वानपथकानेही सुरक्षा पाहणीच्या कामकाजात सहभाग घेतला. मंदिराची सुरक्षा व्यवस्था सुयोग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तीन वेळा बॉम्बशोध पथकाकडून मंदिराची पाहणी केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेची पाहणी
करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरातील सुरक्षेची पाहणी मंगळवारी पोलीस व बॉम्बशोध पथकाने केली.आपत्कालीन परिस्थितीत काम कसे करावे लागेल, याचे प्रात्यक्षिक बॉम्बशोध पथकाने केले.
First published on: 12-07-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey by police in mahalaxmi temple