राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यानंतर कृषीमंत्री तथा शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर संपूर्ण राज्यभरातून टीका केली गेली. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला घेऊन राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी आंदोलन केले. याच आक्षेपार्ह विधानामुळे सत्तार मागील काही दिवसांपासून वेळोवेळी चर्चेचा विषय बनतात. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही हिंदुत्वामुळे बंड केले, असा दावा शिंदे गटातील आमदार करतात. सत्तार यांना या मुद्द्यावरूनही ठाकरे गटाकडून लक्ष्य केले जाते. दरम्यान, ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जिकडे हवा, तिकडे थवा, अशी सत्तार यांची स्थिती आहे, अशी टीका अंधारे यांनी केली. तसेच कुराण आणि इस्लामचा संदर्भ देत त्यांनी सत्तार यांना लक्ष्य केले. त्या उस्मानाबादमध्ये महाप्रबोधन यात्रेदरम्यान जाहीर सभेला संबोधित करत होत्या.
हेही वाचा >> “… अन्यथा सुषमा अंधारेंची सभा उधळून लावणार; राडा तर होणारचं”; उस्मानाबादच्या मनसे जिल्हाध्यक्षाचा इशारा!
“सर्व आमादारांनी हिंदुत्वासाठी बंड केले असेल तर मग कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कशासाठी बंड केले होते. सर्व आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. मात्र त्यावेळी सत्तार गेले नव्हते. अब्दुल सत्तार हिंदू असतील तर त्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जायला हवे होते. जर ते मुस्लीम असतील आणि मुस्लीम धर्माचे ते पालन करत असतील तर आम्ही त्यांना इस्लामच्या भाषेत समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
हेही वाचा >> मुंबई: कुर्ल्यामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; तिघांविरोधात गुन्हा दाखल
“अफवांचं राजकारण करण्यात आलं. मी सिल्लोडला जाऊन कुराणची आयत सांगितली. मी अब्दुल सत्तार यांनी भगवतगीतेचे श्लोक सांगितले तर त्यांना ते समजणार नाही असे मला वाटले. म्हणूनच मी सिल्लोडमध्ये जाऊन कुराणची आयत सांगितली. ज्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केला. इस्लाममध्ये इमानला खूप किंमत असते, असे मी सांगण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांचे इमान कोणाशी आहे. त्यांची इमानदारी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना अशा कोणाशीच नाही. त्यांचे काम जिथे हवा तिथे थवा असे आहे,” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.