मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी ( ३ मार्च ) हल्ला झाला आहे. शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकला गेल्यावर चार जणांच्या टोळक्याने संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. स्टम्पने केलेल्या मारहाणीत संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आलं असून, डिस्चार्ज देण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्यावर शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारेंनी भाष्य करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“संदीप देशपांडेंवरील झालेला हल्ला निंदणीय आहे. या हल्ल्याचा लोकशाहीवर प्रेम असलेल्या माणसाने निषेधच करावा. काही दिवसांपूर्वी प्रज्ञा सातव यांच्यावर किंवा संदीप देशपांडेंवर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेच काय?,” असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : शिंदे गटात पहिल्यांदा मोठी कारवाई; ‘या’ नेत्याची पदावरून हकालपट्टी
“अकोल्यातील शिंदे गटातील संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखामध्ये तुंबळ हाणामारी झाली. संपर्कप्रमुखाने जिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला केला. दिवसाढवळ्या असे हल्ले होत असतील, तर याचा अर्थ कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची पकड ढिली होत आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे,” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.
हेही वाचा : “मी साक्षीला आहे, महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी…”, शशिकांत शिंदेंचं विधान
“या हल्ल्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत,” असेही सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे.