वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेला आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. ज्याला आपल्या कर्तव्याची चौकट कळत नाही, अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला बसावं? असा खोचक सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे.
‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यावरून टीकास्र सोडताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘टाटा एअरबस’ हा महाराष्ट्राबाहेर जाणारा सातवा प्रकल्प आहे. ठरवून महाराष्ट्राचं अर्थकारण खिळखिळं केलं जात आहे. महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. मला वाईट याचं वाटतं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काहीही ठोस उपाय-योजना करत नाहीत.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सातत्याने नवरात्रीची आरती करणे, गणपतीची आरती करणे, पितृपक्षाचं जेवण करणे, यालाच जर आपल्या कर्तव्याची चौकट मानत असतील, तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला असावं? सगळेच उद्योग जर तुम्ही गुजरातला देत असाल, तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा प्रभारी बनवा. किमान यामुळे तरी ते महाराष्ट्राकडे व्यवस्थित लक्ष देतील” अशी टोलेबाजी अंधारेंनी केली आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि कोकणातील सिंधुदुर्ग गोव्याला जोडण्याचा, जो अघोरी प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे, हे पूर्णत: आमच्या लक्षात येत आहे. आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं की, जे स्वत:ला महाराष्ट्राची अस्मिता जपणारे पक्ष म्हणवतात, ते पक्षही अळीमिळी चूपचिळी करून बसले आहेत. ते भाजपाची सुपारी घेऊन काम करत आहेत, अशी टीकाही सुषमा अंधारेंनी केली.