अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण जवळपास अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेत सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरे यांचे ४४ वेळा फोन आले होते, आसा दावा केला. यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी हाच दावा केला. यावरून सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर फोन आलेली AU ही व्यक्ती नेमकी कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे होत असताना खुद्द रियानंच याबाबच केलेल्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी इंडिया टुडेसाठी घेतलेल्या रिया चक्रवर्तीच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये राजदीप सरदेसाईंनी आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप होत असल्याबद्दल विचारणा केली असता त्यावर उत्तरादाखल रिया चक्रवर्तीने AU नेमकं कोण आहे? याचा खुलासा केला होता. “जेव्हा मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास हटवण्याची मागणी केली जाते, तेव्हा मुंबई पोलीस दबावाखाली असल्याचं सांगितलं जातं. नेमका पोलिसांवर कुणाचा दबाव आहे?” असा प्रश्न रिया चक्रवर्तीला विचारण्यात आल्यानंतर त्यावर तिनं उत्तर दिलं.
कोण आहे AU?
“या सगळ्या चर्चांचं उत्तर माझ्याकडे नाहीये. माझ्यावर होत असलेल्या आरोपांपैकी हा एक आरोप आहे. माझी एक मैत्रीण आहे अनाया उदास. तिचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये AU नावाने सेव्ह आहे. पण सगळे म्हणतात त्याचा अर्थ आदित्य उद्धव आहे. यावर खुद्द अनायानं स्पष्टीकरणही दिलं आहे. आम्हीही त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पण वारंवार हे म्हटलं जातं की ते आदित्य ठाकरे आहे”, असं रिया चक्रवर्तीनं म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंचं रिया चक्रवर्तीला संरक्षण?
दरम्यान, आदित्य ठाकरेंचा सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सहभाग असून तेच रिया चक्रवर्तीला संरक्षण देत असल्याचाही आरोप तेव्हा केला गेला. त्यावरही रियानं स्पष्टीकरण दिलं. “मी आजपर्यंत त्यांना कधी भेटले नाही. माझं त्यांच्याशी कधी बोलणंही झालेलं नाही. माझ्याकडे त्यांचा नंबरही नाहीये. मला कुणीही संरक्षण देत नाहीये. मी तर म्हणतेय मला कुणीतरी संरक्षण द्या”, असं रिया या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. शिवसेना नेत्या संजना घाडी यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून आता सत्ताधारी भाजपानं रान उठवलं असून AU म्हणजे आदित्य ठाकरेच असल्याचा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने राहुल शेवाळेंनी केला आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.