काँग्रेसच्या उच्च वर्तुळातील एक समजले जाणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपले ‘राजकीय गुरू’ शरद पवार हे पंतप्रधान झाल्यास आपणास आनंदच होईल, अशा शब्दांत ‘पवारप्रेम’व्यक्त केले व नंतर लगेच घूमजाव केल्याचा वेगवेगळा राजकीय अन्वयार्थ लावला जात आहे. शिंदे यांची ही ‘पवारनिष्ठा’ आताचीच नसून तर यापूर्वीही अनेक वेळा त्यांनी पवार स्तुतिगान गायले आहे. त्याचा राजकीय संबंध आता सोलापूरच्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. विशेषत: पवार यांच्या मदतीशिवाय आपले निवडणुकीचे राजकारण असुरक्षित असल्याची जाणीव कदाचित शिंदे यांना असावी, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
शरद पवार हे आपले राजकीय गुरू आहेत, ते पंतप्रधान झाल्यास त्याचा आपणास आनंदच होईल, असे विधान शिंदे यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात केले व नंतर एका ‘खळी’त हे विधान बदलत राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्याचे आपले ‘लक्ष्य’ असल्याचा निर्वाळा त्यांना द्यावा लागला. त्यांनी आपले विधान बदलले तरी त्यांची पवारनिष्ठा दडली जाऊ शकत नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पवार व शिंदे यांचे सख्य संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. किंबहुना हे दोघेही एकच असल्याची सुरुवातीपासूनची सार्वत्रिक धारणा आहे. या पाश्र्वभूमीवर फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्यामुळे त्या वेळी साहजिकच स्वत: शरद पवार यांनी सोलापुरात येऊन सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुद्ध जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यास शिंदे यांनीही तेवढय़ाच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले होते. या पाश्र्वभूमीवर गेल्या जुलैमध्ये हे नेते प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र आले होते. त्या वेळी शिंदे यांच्याकडमून व्यक्त झालेल्या या शरदनिष्ठेचा अन्वयार्थ समजून घेताना सोलापूर भेटीत शरद पवार यांनी त्याच वेळी शासकीय विश्रामगृहात बसून केलेल्या घडमोडी समजून घ्याव्या लागतील. शिंदे यांचे कट्टर विरोधक माकपचे नेते नरसय्या आडम मास्तर यांच्यापासून ते काँग्रेसमध्ये अडगळीत पडलेले माजी मंत्री आनंदराव देवकते, माजी खासदार धर्मण्णा सादूल यांना पाचारण करून स्वतंत्रपणे बंद खोलीत खलबते केली होती. इतकेच नव्हे तर मागील लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्याकडून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार यांनाही भेटून पवार यांनी कोणता कानमंत्र दिला होता व त्या वेळी पवार यांनी नेमका कोणता ‘होमवर्क’ केला, हे अद्यापि गुलदस्त्यात आहे.
आगामी लोकसभा निवडणूक लढवायला शिंदे हे सरसावले असून त्याची तयारी त्यांनी चालविल्याचे मागील महिनाभरात त्यांच्या सोलापूरच्या वाढलेल्या भेटीतून दिसून येते. स्वत: लोकसभेवर निवडून येण्यासाठी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत कन्या प्रणिती शिंदे यांना पुन्हा आमदार करण्यासाठी शरद पवार यांची मदत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव शिंदे यांनी मागील २००९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत घेतला होता. त्या वेळी केवळ राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या मोहोळ व पंढरपूर-मंगळवेढा भागातून मिळालेली मतांची आघाडीने शिंदे यांना तारले होते. त्याची जाणीव शिंदे यांना असावी. देशातील काँग्रेसविरोधी सद्य:स्थितीचा विचार करता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांना बराच जोर लावावा लागणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मध्य प्रदेश एटीएस पथकाने सोलापुरात येऊन अल्पसंख्याक समाजाच्या पाच संशयितांना केलेल्या अटकेमुळे स्थानिक अल्पसंख्याक समाजात अस्वस्थता पसरली आहे. या कारवाईच्या विरोधात उलेमा संघटनेने केलेले आंदोलन व त्यास मिळालेली प्रतिसाद लक्षात घेता शिंदे यांना अल्पसंख्याकांना गोंजारताना बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्याच वेळी राष्ट्रवादीचीही मर्जी सांभाळावी लागणार आहे. त्यासाठीचा एक भाग म्हणून शिंदे यांनी चालविलेल्या पवार स्तुतिगानाकडे पाहिले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा