मध्य प्रदेश पोलीस व एटीएस यांच्या संयुक्त पथकांनी केलेल्या कारवाईमुळे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा हक्काचा मतदारसंघ असलेले सोलापूर असुरक्षित बनले असल्याची भीती शहरवासीयांमध्ये व्यक्त होत आहे. ‘सिमी’ या दहशवादी संघटनेचे अनेक ‘स्लीपर सेल’ शहरात कार्यरत असल्याचेच या घटनेतून अधोरेखित झाले असून स्थानिक पोलीस मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सिमीचा दहशतवादी सफदर नागोरी याचा हस्तक असलेला खालीद अहमद महमद सलीम मुछाले सुटकेनंतर वर्षभरापासून सोलापुरात वास्तव्यास होता. त्याच्या हालचालींवर स्थानिक पोलिसांनी जातीने लक्ष ठेवणे अपेक्षित होते.
खालीद कोणाच्या संपर्कात आहे, त्याला कोण कोण भेटतात, त्याच्या हालचाली कोणत्या, याची माहिती घेणे स्थानिक पोलिसांना सहज शक्य होते. विशेषत: गृहमंत्र्यांच्या सोलापुरात दहशतवादी कारवाया होऊ नये याची खबरदारी म्हणून खालीदवर लक्ष ठेवले गेले असते तर कदाचित हे प्रकरण यापूर्वीच उघड झाले असते. एवढेच नव्हे तर खालीदच्या साहाय्याने अन्य दहशतवाद्यांच्या हालचालीही दिसून आल्या असत्या. परंतु स्थानिक पोलिसांनी खालीदकडे दुर्लक्ष केले. हे प्रकरण स्थानिक पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आंध्र, कर्नाटकाच्या सीमेवर असलेले सोलापूर हे दहशतवाद्यांसाठी ‘स्लिपर सेल’ म्हणून ओळखले जाते. मुंबई-हैदराबाद महामार्गासह मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगलोर आदी महानगरांशी जोडलेले रेल्वेचे जाळे सोलापुरातून जाते. त्यामुळे यापूर्वी दीनदार अंजुमन संघटना, सिमी आदी दहशतवादी संघटनांच्या हालचाली या शहरात झाल्या होत्या. अलीकडे शहराजवळील होटगी येथील राहणारा लालबाबा बेग या संशयित दहशतवाद्याला एसटीएसच्या पथकाने जेरबंद केल्यावर सोलापुरातील दहशतवाद्यांच्या ‘स्लिपर सेल’वर पुन्हा एकदा प्रकाश पडला होता. या पाश्र्वभूमीवर आता पुन्हा दोन संशयित दहशतवादी तरुण तीन शक्तिशाली बॉम्बसह सापडल्याने एकूणच शहरातील शांतता व सुरक्षिततेच्या मुद्दय़ावर  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.