Sushilkumar Shinde : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Sushilkumar Shinde ) यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्तुती करण्यात आली आहे. वीर सावरकर यांनी स्पृश्य-अस्पृश्यता संपवणं आणि जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केले असा उल्लेख त्यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यावरुन आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. वीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधींनी सुशीलकुमार शिंदेंकडून ( Sushilkumar Shinde ) काहीतरी शिकलं पाहिजे असं बावनकुळे म्हणाले आहेत.

कोणत्या पुस्तकात उल्लेख?

FIVE DECADES IN POLITICS SUSHILKUMAR SHINDE‘ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात सुशीलकुमार शिंदे ( Sushilkumar Shinde ) म्हणतात, “माझ्या मनात वीर सावरकर यांच्याविषयी सन्मान आहे. त्यामुळेच १९८३ मध्ये नागपूरमध्ये वीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. वीर सावरकर यांनी स्पृश्य-अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. मी स्वतः मागासवर्गातून येतो. त्यामुळे वीर सावरकरांनी जे प्रयत्न केले त्याचं महत्त्व मला ठाऊक आहे. वीर सावरकरांचं हिंदुत्व या विषयावर जोर दिला जातो. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक पैलू होते. तसंच वीर सावरकर विज्ञानवादी होते.” सुशीलकुमार शिंदेंचं ( Sushilkumar Shinde ) हे पुस्तक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात वीर सावरकर यांच्याबाबत आदरपूर्वक उल्लेख आहे.

वीर सावरकरांचे अनेक पैलू

वीर सावरकर आणि त्यांचं हिंदुत्व यांचीच चर्चा होते. वीर सावरकर यांच्यातला विज्ञानवादी दृष्टीकोन, त्यांचं तत्वज्ञान, सामाजिक बांधिलकी, समाजातले सगळे घटक एकत्र यावेत म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न याकडे का पाहिलं जात नाही? वीर सावरकरांबाबत एक संकुचित विचार करणं हे काही योग्य नाही. मी राजकारणात प्रदीर्घ काळ घालवला आहे. मला आता असं वाटतं की पक्षाने ही विचारधारा बदलली पाहिजे. असाही उल्लेख सुशील कुमार शिंदेंच्या पुस्तकात आहे.

हे पण वाचा- राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रारीची विशेष न्यायालयात सुनावणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान

काँग्रेसची भूमिका सावरकरविरोधी

वीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसची भूमिका ही कायमच त्यांच्यावर टीका करण्याची आहे हे महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं आहे. राहुल गांधी यांचं वक्तव्य “मेरा नाम राहुल गांधी है, मेरा नाम राहुल सावरकर नहीं है, इसलिये मैं माफी नहीं मांगूंगा” अजूनही देशाच्या स्मरणात आहे. काँग्रेसची भूमिका सावरकर विरोधी आहे यात काही शंकाच नाही. मात्र आता सुशीलकुमार शिंदेंच्या पुस्तकात वीर सावरकरांची स्तुती असणं आणि पक्षाची भूमिका विरोधी असणं यामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुस्तकातल्या या उल्लेखावरुन राहुल गांधींना सल्ला दिला आहे.

सुशीलकुमार शिंदेंच्या पुस्तकात वीर सावरकरांच्या कार्याचा गौरव (फोटो- अमित जोशी)

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पहिल्यांदाच काँग्रेस पक्षातल्या नेत्याने त्यांची स्तुती केली आहे. तसंच त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. राहुल गांधी यांनी यातून शिकवण घेतली पाहिजे. राहुल गांधींना सुशीलकुमार शिंदेंनी भेटलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की जो अभ्यास शिंदेंनी केला आहे तो त्यांनी राहुल गांधींना सांगितला पाहिजे. राहुल गांधींना विचारसरणी बदलण्याचा सल्ला सुशीलकुमार शिंदेंनी दिला पाहिजे. राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी वीर सावरकर यांचा त्यांनी अपमान केला आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्याची शिकवण राहुल गांधींनी घेतली पाहिजे. “