हिंदू दहशतवादाच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपली भूमिका कायम ठेवल्याचे संकेत दिले आहे. या संदर्भात आपण स्पष्टपणे वक्तव्य केले आहे. माझी तीच प्रतिक्रिया आहे, जी मी व्यक्त केली आहे. त्यावर आपण पुन्हा अधिक बोलणार नाही, असे सूचक विधान शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
रविवारी दुपारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्याक्रमात शिंदे यांनी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारत आपली भूमिका स्पष्ट केली. जयपूर येथे काँग्रेस शिबिरात बोलताना शिंदे यांनी संघ परिवाराकडून हिंदू दहशतवादाची प्रशिक्षण केंद्र चालविले जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यावर संघ परिवारासह हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या विरोधात देशभर गदारोळ माजविला असता अलीकडेच केंद्रीयमंत्री कमलनाथ यांनी शिंदे यांच्या वतीने खेद व्यक्त केला होता. नंतर भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी नरमाईची भूमिका घेतली. या पाश्र्वभूमीवर शिंदे यांना छेडले असता त्यांनी मोघम स्वरूपाचे वक्तव्य केले. या संदर्भात मी स्पष्टपणे भाष्य केले आहे. माझी तीच प्रतिक्रिया आहे, जी मी केली होती. त्यावर पुन्हा अधिक बोलणार नाही, असे त्यांनी सूचकपणे नमूद केले. या मुद्यावरील प्रश्नाची खोच आपण समजू शकतो, असे ते म्हणाले. याच मुद्यावर बोलताना शिंदे यांनी आपण यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर गेलो होतो, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्या वेळी आपण हिंदू नव्हतो काय, असा सवाल उपस्थित केला.
महाराष्ट्रात एमआयएम संघटना हातपाय पसरण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी, एमआयएमप्रमाणे काही हिंदू कडव्या संघटनाही आहेत. या संघटना हिंदू-मुस्लीम समाजात भेदभावाची दरी निर्माण करून विष पसरवितात. त्याची केंद्राकडे नोंद आहे. त्याबाबतच्या स्पष्ट सूचना आपण ज्या त्या राज्यांना देत असतो, असे स्पष्ट केले.
राज ठाकरे नकलाकार
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांची नक्कल करून दाखविली होती. त्याकडे लक्ष वेधले असताना शिंदे यांनी, राज ठाकरे हे नकलाकार आहेत, ते नकलाच करीत राहणार, अशी  प्रतिक्रिया व्यक्त केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे’ असा करीत शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे राजकारण वेगळे होते. त्यांचा काळही वेगळा होता. त्यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. ती आपण राज्यात सत्तेवर असताना अमलात आणली. राजकारणातून निवृत्ती घेण्याचा आपला विचार शिंदे यांनी पुन्हा एकदा बोलून दाखविला. येत्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारण सोडून घरी बसण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून सहा महिने पूर्ण झाले. त्याबाबतचा आढावा घेताना शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. आपला चेहरा मुळातच हसतमुख आहे. देवानेच हा हसतमुख चेहरा दिला आहे. त्याला मी तरी काय करणार,असा प्रतिसवाल करीत शिंदे यांनी, गृहमंत्री म्हणून योग्य तऱ्हेने जबाबदारी पार पाडण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

Story img Loader