सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अवघ्या अकरा महिन्यांत राजकीय हितसंबंधातून झालेली बदली रद्द व्हावी म्हणून बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गुडेवार यांची बदली अचानक कशी झाली, याचा खुलासा करण्याची मागणीही चंदनशिवे यांनी शिंदे यांच्याकडे केली.
शिंदे हे एका कार्यक्रमासाठी सोलापुरात आले असता नगरसेवक चंदनशिवे यांनी त्यांची भेट घेतली. गुडेवार यांनी शहरात बेकायदा बांधकामांविरुदद्ध मोहीम हाती घेतली, अतिक्रमणे काढून रस्ते रूंद केले. संपूर्ण शहराला डिजिटल फलकमुक्त केले. राज्य व केंद्राच्या विविध विकास योजना आणल्या व विकासाभिमुख कारभार केला. स्वच्छ, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन चालविले. आणखी दोन वर्षे त्यांची सोलापूर महापालिकेत गरज असताना त्यांना अचानक परत पाठविण्यात आले. त्यामुळे सामान्य सोलापूरकर नाराज झाले असून बदली प्रकरणाचा दोष सत्ताधाऱ्यांना देत आहेत, याविषयी शिंदे यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट करावी आणि खुलासा करावा, अशी मागणी चंदनशिवे यांनी केली. परंतु शिंदे यांनी याप्रकरणी थंडा प्रतिसाद दिल्याचे चंदनशिवे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा