कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३६ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळविल्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता वाढली असताना हा तिढा सोडविण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार रविवारी एका विशेष विमानाने शिंदे बंगळुरूला रवाना झाले.
हेही वाचा >>> “देशाचा पिंड सर्वधर्मसमभाव तर, कर्नाटकचा पिंड…”, निवडणूक निकालानंतर प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
कर्नाटकात काँग्रेसने धवल यश मिळविल्यानंतर तेथे सत्तास्थापनेला वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोघे नेते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कर्नाटकासाठी पक्षनिरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या जबाबदारीसंदर्भात शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी”, मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर अंधारेंचा टोला; म्हणाल्या…
दरम्यान, नवी दिल्लीहून पक्षश्रेष्ठींचा सुशीलकुमार शिंदे यांना पक्ष निरीक्षक म्हणून तात्काळ रवाना होण्यासाठी आदेश प्राप्त झाला. त्यानंतर लगेचच त्यांना बंगळुरूला नेण्यासाठी विशेष विमानही सोलापुरात आले. शिंदे हे या विशेष विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले. मुख्यमंत्रिपदाची निवड प्रक्रिया होईपर्यंत शिंदे हे बंगळुरूमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. पक्ष निरीक्षकपदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजताच सात रस्त्यावरील जनवात्सल्य निवासस्थानी स्थानिक प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी गर्दी करून शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.