महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीकडून ( बीआरएस ) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. अनेक माजी आमदार, नगरसेवक आणि नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. तर, येणाऱ्या दिवसांतही मोठ्या नेत्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडणुकीत फटका बसू शकतो. यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते अकलूजमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“मला वाटत नाही बीआरएसमुळे काँग्रेसला गळती लागेल. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव येऊन पाहणी करून जातील. पण, त्यांच्या हाती काही लागणार नाही,” असं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.
हेही वाचा : तेलंगणाचे मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दर्शन घेऊन शक्तिप्रदर्शन करणार; अजित पवार म्हणाले, बीआरएसला कमी लेखू नये
पाटण्यात शुक्रवारी ( २३ जून ) विरोधी पक्षांची बैठक झाली. याबद्दल विचारल्यावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “पाटण्यातील बैठकीत एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. ही बैठक म्हणजे लोकशाही खंबीर करण्याच्या दृष्टीने सुरूवात झाली आहे. दुसरी बैठक होणार असून, ते चांगल्या प्रकारे लोकशाहीच्या मार्गाने चालले आहे.”
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पश्चिम महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. याचा काँग्रेसवर काय परिमाण होईल? असं विचारल्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं, “भाजपाचे खूप दिवसांपासून दौरे सुरु आहेत. पण, याचा काहीही परिणाम काँग्रेसवर होणार नाही. काँग्रेस दिवसेंदिवस बळकट होत आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.”