महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपाकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाली होती, असा गौप्यस्फोट करून आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेसपेक्षा भाजपाच्याच नेत्यांनी हिरीरीने प्रतिक्रिया दिल्या. त्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली. शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर याबाबतचा खुलासा केला.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“भाजपाने २०१९ सुशीलकुमार शिंदेंना अधिकृतपणे किंवा अनधिकृतपणे ऑफर दिलेली नाही. राज्यातील सुसंस्कृत घराण्यांपैकी शिंदे एक आहेत. त्यामुळे ते स्वतःच्या पक्षात असावेत, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यांच्याशी आपुलकीने बोलत असताना आमच्या पक्षात या, असे कुणी म्हणाले असतील. पण ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही. राजकीय भेट ही वर्षानुवर्ष तुम्हाला कळणार नाही, इतक्या गुप्तपणे होत असते”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. दर दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांनीही माध्यमांशी बोलताना असेच सांगितले की, या गुप्त गोष्टी असतात. त्या जाहीरपणे सांगता येणार नाही.
हे वाचा >> भाजपमध्ये सामील होण्याच्या प्रस्तावाच्या गौप्यस्फोटामागे सुशीलकुमार शिंदे यांचे दबावाचे राजकारण?
प्रणिती स्वतःचे निर्णय घ्यायला स्वतंत्र
दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर माध्यमांनी सुशीलकुमार शिंदे यांचीही प्रतिक्रिया जाणून घेतली. तेव्हा त्यांनी या भेटीबाबत सविस्तर भाष्य केले. “चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापूर येथे होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाचे निमंत्रण दिले. पालकमंत्री स्वतः येऊन स्थानिक नेत्यांना निमंत्रण देतात, ही चांगली बाब आहे. नाहीतर असे कार्यक्रम एका पक्षाचे होऊन जातात. मात्र कार्यक्रमात सर्व पक्षाच्या नेत्यांनी यावे, अशी त्यांची भूमिका आहे. याचा आनंद वाटला”, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
आणखी वाचा >> “मला दोन वेळा भाजपाची ऑफर..”, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट; प्रणिती शिंदेंबाबत बोलताना म्हणाले…
भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यास भाजपाचे नेते तुमचे स्वागत करणार आहेत, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता शिंदे म्हणाले की, भाजपाचे लोक स्वागत तर करणारच. पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाचेच स्वागत केले जाते. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत आणखी स्पष्टपणे सांगताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, मी याआधीच माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. माझे आयुष्य काँग्रेसमध्ये गेले, मी काँग्रेसी आहे. त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रश्नच येत नाही. मग प्रणिती शिंदे या भाजपाच जाणार का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले, “प्रणितीच्या मनात काय आहे, हे मी सांगू शकत नाही. ती प्रगल्भ आणि स्वतंत्र आहे.”