सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यावरून आता काँग्रेस अंतर्गतच वाद सुरू झाला आहे. हा पुरस्कार देण्यामध्ये पुढाकार घेतलेल्या काँग्रेस नेत्यांवर माजी मंत्री वर्षां गायकवाड यांनी कारवाईची मागणी केली आहे. याबाबत लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मौन बाळगले आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
लोकमान्य टिळक स्मारक संस्थेवर बहुसंख्य विश्वस्त हे काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. असे असताना त्यांनीच यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. याबाबत मोदी यांचा होकार मिळवण्याची जबाबदारी या नेत्यांकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सोपवण्यात आली. दरम्यान, हा पुरस्कार जाहीर झाल्यापासून यावर काँग्रेस अंतर्गतच वाद सुरू झाला आहे. काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशपातळीवर विरोध करत असताना पक्षाच्याच काही नेत्यांकडून त्यांचा गौरव केला जात आहे.
पवारांकडूनही त्यांची पाठराखण केली जात असल्याने त्यावर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गतच काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्या आणि माजी मंत्री वर्षां गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करत या संस्थेशी संबंधित काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे आणि त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर काहीही प्रतिसाद न देता मौन राखणे पसंत केले. हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळीही शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पुरस्काराचा निर्णय संस्थेने एकमताने घेतल्याचे स्पष्ट करीत, मौन बाळगले होते.