अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार महिने उलटले असून, या हत्याप्रकरणाचा छडा अद्याप लागला नाही. यापूर्वी राज्याच्या गृहखात्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे सापडल्याचे विधान आपण केले होते, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी देत राज्याच्या गृहखात्याला उघडे पाडले. या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत होण्यासाठी जोपर्यंत राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करीत नाही, तोपर्यंत त्यात केंद्र हस्तक्षेप करू इच्छित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत राज्याच्या पोलीस तपास यंत्रणेला हत्येबाबत कोणतेही धागेदोरे हाती मिळाले नसल्याचे शिंदे यांनी नमूद केले. यापूर्वी या प्रकरणात धागेदोरे मिळाले असून लवकरच मारेकऱ्यांना पकडण्यात येईल, असे विधान त्यांनी केले होते. परंतु, हे विधान आपण के वळ राज्याच्या गृहखात्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच केले होते. प्रत्यक्षात मारेकऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही किंवा या हत्येमागे कोणत्या शक्ती आहेत, याचाही सुगावा लागला नसल्याची कबुली त्यांनी दिली.
राज्यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीअंतर्गत चाललेला कलगीतुरा व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न होत असल्याच्या मुद्दय़ावर छेडले असता शिंदे यांनी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ व पारदर्शी असून, त्यांचा कारभार उत्तम प्रकारे सुरू असल्याचा निर्वाळा दिला.
आगामी लोकसभा निवडणुका ठरल्याप्रमाणे मुदतीत होतील, असे भाकित त्यांनी वर्तविले. भाजपने चार राज्यात सत्ता मिळविली असली तरी यापूर्वीचा इतिहास पाहता २००४ साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीनेच जिंकल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती आगामी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतही दिसून येईल, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी हेच असतील व त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुका जिंकण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. – सुशीलकुमार शिंदे