‘शरद पवार हे माझे गुरू आहेत. ते पंतप्रधान झाल्यास मला आनंदच होईल,’ असे स्मितहास्यमुद्रेने सोलापुरात सांगणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत पोहोचताच त्याच मुद्रेने ‘राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे,’ असे सांगत काही तासांत कोलांटउडी मारली. महाराष्ट्रात पवारांवर प्रेम आणि दिल्लीत पक्षश्रेष्ठींचा विश्वास या दोन्हींमध्ये एका दिवसात शिंदेंनी कोलांटउडी मारली.
सोलापूरमधील एका स्थानिक वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना शिंदे शरद पवारांबद्दल भरभरून बोलले. ‘मी १९७४ सालच्या करमाळा विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होतो. त्या वेळी आपण पुढे कधी तरी मुख्यमंत्री होऊ, असे वाटले नव्हते.
शरद पवारांनी मला राजकारणात आणले,’ असे ते म्हणाले. पवार मंत्रिमंडळात आपल्यासह काही मंत्र्यांनी बंड केले होते. तरीही नंतर सर्व बंडखोर मंत्रिमंडळात राहिले, अशी आठवणही त्यांनी सांगितली. ‘पवारांनी आपणासारख्या बंडखोरांना मंत्रिमंडळात कसे ठेवले,’ या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे यांनी ‘पवार हे धूर्त
राजकारणी आहेत. त्या वेळी त्यांना भवितव्य दिसत होते. त्या वेळी तिघा-चौघा मंत्र्यांच्या पवारविरोधी बंडामागे फार मोठे पाठबळ होते,’ असे सांगत पवारांच्या राजकारणाचाही दाखला दिला.
‘पुढील पंतप्रधान काँग्रेसचा नसेल हे शिंदेंना मान्य’
सुशीलकुमार शिंदे यांनी केल्याने वक्तव्यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा वारसदार काँग्रेसचा नसेल हे पक्षाने मान्य केल्याचेच सिद्ध होते, असे मत भाजपने व्यक्त केले आहे. पुढील पंतप्रधान कोण होईल याची दिवास्वप्ने शिंदे यांनी पाहिली तरी जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आधीच विश्वास दाखविला आहे, असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. मोदींमध्ये जनतेला आर्थिक प्रगती, खरा न्याय आणि अपेक्षापूर्ती दिसते, असेही जावडेकर म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिंदे यांना पंतप्रधान निवडण्याचे काम उरणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Story img Loader