मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगावातील सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी हे आरोप केले आहेत. तसेच त्यांनी निवडणूक आयोग कुठं आहे? असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.

हेही वाचा – “छगन भुजबळ व्हाया सुरत, गुवाहाटी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीत, त्यांना…” ठाकरे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया!

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक व्हिडीओ शेअर करत महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. या सभेनंतर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. हे आरोप करताना सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. तसेच निवडणूक आयोग कुठं आहे? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार आहे. यानिमित्त काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रात्री जळगावातील आदित्य लॉन येथे सभाही घेतली. या सभेला जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला उपस्थित होते.

हेही वाचा – सह्याद्रीवर ओबीसी शिष्टमंडळ बैठकीत असताना सुषमा अंधारेंचं टीकास्र; म्हणाल्या, “दोन्ही समाजांना खेळवण्याचं…”

महत्त्वाचे म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मुख्य लढत शिवसेनेच्या शिंदे गटाचे किशोर दराडे आणि शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर भावसार यांच्यात असल्याचे बोललं जात आहे.