शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारेंवर विरोधकांकडून पैसे घेऊन ‘पेड’ कार्यक्रम घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. याबाबत पत्रकारांनी सुषमा अंधारेंना प्रश्न विचारला. यावर सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं. “ठीक आहे, मी पैसे घेऊन पेड कार्यक्रम करते असं मानलं. मात्र, मी विचारलेले प्रश्न चुकीचे आहेत का?” असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला. त्या मंगळवारी (२७ डिसेंबर) सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुषमा अंधारे म्हणाल्या, “ओके, ठीक आहे, सुषमा अंधारे पैसे घेऊन पेड कार्यक्रम करते असं मानलं. मात्र, सुषमा अंधारेने विचारलेले प्रश्न चुकीचे आहेत का? मी जे मुद्दे उपस्थित केले ते चुकीचे आहेत का? सुषमा अंधारे तुम्हाला सांगतेय की, मोहित कंबोज, जयकुमार रावल, प्रकाश मेहता, प्रविण दरेकर यांच्यासह १५ लोकांना क्लीन चिट देण्यात आली. ते चूक आहे की नाही? ज्या चार मंत्र्यांवर आज आरोप झाले ते चूक आहेत का?”

“दादाहो दिवा सोन्याचा असला काय अन्…”

“दोन एकनाथांमध्ये न्याय देताना फरक करत आहेत. एकनाथ खडसेंना वेगळा न्याय आणि एकनाथ शिंदेंना वेगळा न्याय दिला जात आहे. हे चूक आहे की नाही? अहो यावर बोला की. दादाहो दिवा मातीचा असला काय, जर्मनचा असला काय, सोन्याचा असला काय अन् चांदीचा असला काय त्याने फरक पडत नाही. दिवा उजेड देतो का हे महत्त्वाचं आहे. त्या उजेडाकडे बघा की जरा,” असं प्रत्युत्तर सुषमा अंधारेंनी विरोधकांना दिलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : Photos : “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात, कारण…”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

“सुषमा अंधारेला दिवसाढवळ्या रोज जीवे मारण्याच्या धमक्या”

सुषमा अंधारे म्हणाल्या, “भरत गोगावलेंविषयी व्हॉट्सअॅप चॅटवर एक अपशब्द निघाला, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुन्हा दाखल करून घेतात. सुषमा अंधारेला दिवसाढवळ्या जीवे मारण्याच्या धमक्या रोज दिल्या जातात. सोशल मीडियावर एका महिलेला अत्यंत गलिच्छ पद्धतीने बोललं जातं, त्यावर देवेंद्र फडणवीसांची जीभ अजिबात उचलत नाही.”

“अमृता फडणवीसांबद्दल कोणी बोललं तर फडणवीसांचे भक्तुल्ले…”

“देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांबद्दल कोणी बोललं तर फडणवीसांचे भक्तुल्ले तुटून पडतात. जेवढी आमच्या वहिनींची इभ्रत महत्त्वाची आहे, तेवढीच तुमची बहिण म्हणून माझी इभ्रत महत्त्वाची आहे. यावर फडणवीसांनी एकदा तरी बोलावं. कुठे शिळ्या कढीला उत आणत आहात,” अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

“१३ वर्षे तुम्ही झोपला होतात का?”

“देवेंद्र फडणवीस इतके अभ्यासू आहात, नाही नाही ते सर्व मुद्दे काढले होते. १३ वर्षे तुम्ही झोपला होतात का? आत्ता तुम्हाला हे सर्व सुचतंय का?” असा सवाल अंधारेंनी विचारला.

हेही वाचा : Photos : सुषमा अंधारेंवर विभक्त पतीचे गंभीर आरोप, म्हणाले, “एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य…”

“सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही”

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “तुम्हाला असं वाटतंय की, तुमच्या या जाळ्यात मी अडकेल, पण अजिबात नाही. यानंतरही मी चुकतेय असं वाटत असेल, तर मी पुन्हा एकदा सांगते की, भागवत संप्रदायाचा कुठलाही सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही. हे आहे ते मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहेत.”

“फडणवीस आदित्य ठाकरेंबरोबरही चर्चेला बसले नाहीत, कारण…”

“या धारकऱ्यांनी सुपारी घेऊन काम करणं सुरू केलं असेल, तर मला बाकीच्या भक्तुल्ल्यांविषयी अजिबात बोलायचं नाही. मात्र, फडणवीसांना माझी विनंती आहे की, मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंबरोबरही चर्चेला बसले नाहीत. कारण फडणवीस खोटारडे आहात. म्हणूनच ते चर्चेला बसत नाहीत,” अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

हेही वाचा : Photos : “१३ वर्षे तुम्ही झोपला होतात का?”, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

“मी फडणवीसांबरोबर चर्चेला बसायला तयार”

“या सर्व विषयांवर मी फडणवीसांबरोबर चर्चेला बसायला तयार आहे. फडणवीसांना वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही अभ्यासू मंत्र्याला चर्चेला बसवावं. माझी चर्चा करण्याची तयारी आहे,” असं आव्हान त्यांनी फडणवीसांना दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare answer allegations of paid program by opposition in solapur rno news pbs