भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यानंतर आव्हाडांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला. राजीनामा पवारांकडे दिल्यावरून भाजपाने आव्हाडांचा राजीनामा ‘नौटंकी’ असल्याची टीका केली. त्यावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी संभाजी भिडे, अब्दुल सत्तार, गुलाब पाटील यांची नावं घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “भाजपा कशाला काय म्हणेल सांगता येत नाही. हा राजीनामा देणं नौटंकी आहे असं भाजपाला वाटत असेल, तर संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी रान पेटवणं आणि आता आमच्यासाठी संजय राठोड संपला असं म्हणणं हा सत्संग आहे का? या प्रश्नाचं उत्तर भाजपाने दिलं पाहिजे.”
व्हिडीओ पाहा :
“सत्तार, गुलाबराव, भिडेंवर गुन्हे दाखल का झाले नाही?”
“नौटंकीची व्याख्या काय हे एकदा ठरवलं पाहिजे. भाजपा काय करतेय हे त्यांनी आधी ठरवावं. ताई बाजूला व्हा असं म्हणणं विनयभंग असेल, तर अब्दुल सत्तार, गुलाब पाटील, संभाजी भिडे या सर्वांवर अशाचप्रकारे गुन्हे दाखल का झाले नाही? यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देतील का?” असा सवाल सुषमा अंधारेंनी केला.
“फडणवीसांनी द्वेषाचं राजकारण संपावं म्हणणं नौटंकी नाही का?”
“फडणवीसांनी द्वेषमुलक राजकारण संपलं पाहिजे असं म्हणणं नौटंकी नाही का याचाही त्यांनी विचार केला पाहिजे,” असं म्हणत अंधारेंनी फडणवीसांना टोला लगावला. तसेच उल्हासनगरमध्ये भाजपा व शिंदे गटावर सडकून टीका करत लोकशाहीचा खून आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असंही अंधारे यांनी म्हटलं.