शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे फलक (बॅनर) चोरी गेल्याचा प्रकार घडला. यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार टोलेबाजी केली. “ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय. मी या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे, मला मजा येत आहे,” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी व्यक्त केली. त्या मंगळवारी (१ नोव्हेंबर) महाप्रबोधन यात्रेसाठी जळगावात आल्या असताना पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय. मी या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे, मला मजा येत आहे. तुम्ही बॅनर पळवत आहात, पण बॅनर पळवल्याने काय होणार आहे. तुम्ही बॅनर पळवू शकता, शिवसैनिक पळवू शकता का? तुम्ही शिवसैनिकाचा विचार पळवणार आहात का? तुम्ही शिवसैनिकांची आमच्यासोबत असलेली आपुलकी, आपलेपणा पळवू शकणार आहात का?”
“मला वाटतं गुलाबराव पाटलांनी असे छोटे-मोठे चिल्लर चाळे करू नये. नाहीतर कुठल्यातरी गाण्यासारखं लोकंच त्यांना विचारतील की, ‘कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का? काल म्हणे तुम्ही गुवाहाटीला गेला, खोक्याबिक्याचा काही तरी कारभार केला’. अशी वेळ गुलाबराव पाटलांनी स्वतःवर येऊ देऊ नये,” असं सुषमा अंधारे यांनी खोचकपणे म्हटलं.
सुषमा अंधारे बंडखोर आमदारांवर बोलताना म्हणाल्या, “मी वारंवार सांगत आहे, आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. त्यामुळे जिल्ह्यातील पाच आमदार गेले असले आणि त्यांच्यासोबत काही टेंडर, गुत्तेदारीच्या राजकारणातले लोक गेले असले, तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेचं नुकसान झालं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, जळगावमध्ये जोपर्यंत इथले सर्वसामान्य शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरजच नाही.”
“पाचोर्यात आदित्य ठाकरेंची सभा जळगावसाठी न भूतो न भविष्यती अशी झाली होती. जे पाच लोक गेलेले आहेत, सत्ता असतानाही त्यांना वाय प्लस सुरक्षा घेऊन फिरावे लागते आहे, यातच सर्वकाही उत्तर येते. बंडखोरांनाच सुरक्षेची गरज आहे. कारण, विरोधकांच्या पाठीशी लोकबळ आहे. लोक त्यांना सांभाळून घेत आहेत,” असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.
“लोकांना माहिती आहे, सत्ताधार्यांना सुरक्षेची गरज आहे. सत्ताधार्यांनी सत्ता ही अत्यंत कुटीलपणे, कुटनीतीने आणि कपटकारस्थानाने मिळविलेली आहे आणि ही कपटकारस्थाने जनतेला आवडलेली नाहीत. त्यामुळे जनता अत्यंत संतप्त आहे. या संतप्त जनतेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी, तसेच त्यांना काही करू नये, म्हणून घाबरलेल्या सरकारने ही सुरक्षा वाढवून घेतली आहे. कारण, यामुळे त्यांना लोकांचे पाठबळ नाही,” असा घणाघातही अंधारे यांनी केला.
अंधारे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावरही वाक्बाण सोडले. त्या म्हणाल्या, “किशोर आप्पांनी असं म्हटलं पाहिजे, पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. किशोर आप्पांचा अभ्यास असता तर त्यांना कळलं असतं, की सुषमा अंधारे गेली बावीस वर्षे सातत्याने फक्त राज्यभर नाही, देशभर नाही, तर जगभरातल्या शोषित, वंचितांच्या चळवळींमध्ये काम करतेय; परंतु ठीक आहे. जर त्यांना वाटतंय की, तुम्ही तीन महिन्यांनंतर दिसताहेत, तर तीन महिन्यांनंतरही ठीक. मुद्दा काय आहे, सुषमा अंधारे बाळ आहे का? सुषमा अंधारे तीन महिन्यांनंतर आली आहे का? सुषमा अंधारे नवी आहे का? सुषमा अंधारे आधीची टीकाकार आहे का? या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे काय आहे, सुषमा अंधारे जे प्रश्न तुम्हाला विचारत आहे, त्याची उत्तरे तुमच्याकडे आहेत का?”
हेही वाचा : “हे तीन महिन्याचं बाळ, त्यांनी बाळासाहेब ठाकरे…”, गुलाबराव पाटलांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद, वेदांता-फोक्सकॉन प्रकल्पासह टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्याबाबतही त्यांनी भाष्य केले. त्यावर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. “महाराष्ट्रातला एकेक उद्योग प्रकल्प गुजरातला जातो. सध्या महाराष्ट्राला कंगाल करण्याचे षडयंत्र चालू आहे. उद्योजकांशी व्यवस्थित बोलणे, समन्वय साधणे, उद्योजकांना आश्वस्त करणे, ही जबाबदारी सरकारची असते. सरकार येत-जात राहते. मात्र, उद्योगधंदे येत-जात नाहीत. उद्योगधंदे स्थिरावतात. आधीही सरकारांची अदलीबदली झाली. मात्र, उद्योगधंदे गेले नव्हते,” असेही अंधारे यांनी सरकारवर टीका केली.