ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेतील बंडखोर ४० आमदारांवर टीका करताना त्यांचा चोरमंडळ असा उल्लेख केला. यानंतर या वक्तव्यावरून राजकारणाचा पारा चढला. विधिमंडळात राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर झाला. भाजपा आणि शिंदे गटाने या मुद्द्यावर महाविकासआघाडीची कोंडी केली. याबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी स्पष्ट शब्दात त्यांची भूमिका मांडली. त्या गुरुवारी (२ मार्च) अकोला जिल्ह्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होत्या.
संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ वक्तव्याला पाठिंबा की विरोध? असा प्रश्न विचारला असता सुषमा अंधारे म्हणाल्या, “मला एक कळत नाही की, संजय राऊत जेव्हा चोरमंडळ म्हणाले तेव्हा ज्या लोकांना झोंबलं आहे त्यात सर्व भाजपाचे का आहेत? मी ‘चोर के दाढी में तिनका’ असं म्हटलं असेल तर जो चोर आहे तोच आपली दाढी चाचपडेल. ते त्यांची दाढी का तपासत आहेत. हा प्रश्न यांना विचारला पाहिजे.”
व्हिडीओ पाहा :
“…तर नक्कीच ही जागाही आम्ही जिंकली असती”
सुषमा अंधारेंनी पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “पिंपरी चिंचवडची लढत तिहेरी लढत होती. त्यामुळे हा तोटा झाला. ही लढत दुहेरी असती तर नक्कीच ही जागाही आम्ही जिंकली असती. कसब्याच्या निवडणुकीत चारवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले रासने यांच्यासाठी अर्ध्यापेक्षा अधिक मंत्रिमंडळ या निवडणुकीत उतरवलं होतं. तब्बल चार टर्म भाजपाचा बालेकिल्ला असणारी ही जागा आज भाजपाच्या हातून जाते आहे.”
हेही वाचा : Photos : “१३ वर्षे तुम्ही झोपला होतात का?”, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
“खरी शिवसेना भाजपाबरोबर होती तोपर्यंत त्यांचा विजय होत होता”
“मला असं वाटतं की, जोपर्यंत खरी शिवसेना भाजपाबरोबर होती तोपर्यंत त्यांचा विजय होत होता. आज खरी शिवसेना महाविकासआघाडीबरोबर आहे आणि निर्णयही मविआच्या बाजूने आहे. हा कौल एका अर्थांने लोकांच्या मनात भाजपाबद्दलचा रोष दाखवणारा आहे. लोक चिडलेले आहेत आणि जनमताचा कल आता मविआच्या बाजूने वळतं आहे हे स्पष्ट होतं आहे,” असं मत सुषमा अंधारेंनी व्यक्त केलं.