मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही नेत्यांनी पक्षविस्तारासाठी काम केले आहे. ठाकरे गटातील फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्यांनी सभा, भाषणांच्या माध्यमातून विरोधकांवर कोठर प्रहार केले आहेत. याच कारणामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकते असा अंदाज लावला जात आहे. याबाबत विचारले असता सुषमा अंधारे यांनी चपखल शब्दांत उत्तर दिले आहे. त्या आज (२५ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होत्या.
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्यात युती झालेली आहे. या युतीमुळे दोन्ही गटांची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी लोकसभा किंवा विधानसभेच्या एखाद्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आहेत का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना “आमच्याकडे लेट पण थेट कार्यक्रम असतो. आमच्याकडे कोणी कोणाला सूचना देत नाही. मी वारंवार सांगते की शिवसेना हा केडरबेस पक्ष आहे. पक्षप्रमुखांनी आदेश द्यायचा आणि तो आम्ही पाळायचा असे आहे. त्या-त्या वेळेला आम्हाला आदेश मिळतील. तुर्तास तरी आम्ही संघटनाबांधणीवर काम करत आहोत,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
हेही वाचा >>> चिंचवड जागेसाठी ठाकरे गट आग्रही! शिवसेना भवनातील बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले; “राष्ट्रवादीने कसे लढावे हे…”
देशाचे संविधान वाचले तर आम्ही वाचू
“मी जीवावार उदार माणूस आहे. माझ्याकडे गमवायला काहीही नाही. घराचा हफ्ता कसा भरायचा याचा मला ताण आहे. त्यामुळे अशा जेमतेम परिस्थितीतील माणसाला एक कळलं आहे की देशाचे संविधान वाचले तर आम्ही वाचू. संविधान वाचवण्याची लढाई उद्धव ठाकरे लढू शकतात. आम्ही त्यांच्यासोबत आहोत,” असेही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> ‘आदित्य ठाकरेंना अनुभव नाही’ म्हणणाऱ्या दीपक केसरकरांना अरविंद सावंतांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या दिव्याखाली…”
म्हणजेच सरकार पडण्याच्या तयारीत आहेत
“मोदी यांनी मुंबईत येऊन महापालिकेच्या प्रचाराचे नारळ फोडले आहे. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने बोलले, ते पाहता लवकरच मुंबई महापालिका निवडणूक लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकाही लवकरच लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच सरकार पडण्याच्या तयारीत आहेत,” असे भाकीत सुषमा अंधारे यांनी केले.