शिंदे-भाजपा सरकार गुजरातपुढे दबून चालतं. एकनाथ शिंदेंना निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना प्रत्येकवेळी दिल्लीला जावून विचारावे लागतं. त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर, देवेंद्र फडणवीस बोलून देत नाहीत, माईक काढून घेतात, चिठ्ठ्या पुरवतात, असा आरोप शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी केला आहे.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी सुषमा अंधारे बोलत होत्या. “मराठा नेतृत्वाकडे निर्णय क्षमता नसते, हे दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि आरएसएसकडून सुरु आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यालाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी लोक लागतात. येथील बहुजन लोकांनी महाराष्ट्राचं नेतृत्वपद आणि मुख्यमंत्रीपद घेण्याची कुवत नाही. हे दाखवण्यासाठी माईक काढणे, चिठ्ठया पुरवणे अथवा गिरीश महाजन यांनी काहीतरी बोलणे हे ठरवून केलं जात आहे,” असेही सुषमा अंधारेंनी म्हटलं.
हेही वाचा : “माझ्यासाठी विषय संपला”, रवी राणांकडून दिलगिरी व्यक्त, बच्चू कडूंसंबंधी केलेलं वक्तव्य घेतलं मागे
“लोकांच्या डोक्यात धर्माचं खूळ घालण्याचा प्रयत्न”
सुषमा अंधारेंनी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. “लोक उद्योगांवरून प्रश्न विचारतील म्हणून शेलार जाणीवपूर्वक हिंदू मुस्लीम कार्ड खेळत आहेत. त्यामुळे लोकांनी प्रश्न विचारायच्या आधीच त्यांच्या डोक्यात धर्माचं खूळ घालण्याचा प्रयत्न शेलार यांच्याकडून सुरु आहे,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.