उद्धव ठाकरे गटाकडून महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने रविवारी नांदेडच्या मुखेड येथे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच यावेळी राजकीय टोलेबाजीदेखील बघायला मिळाली.
हेही वाचा – “एकनाथभाऊ डायलॉग खूप मारतात, पण…”, सुषमा अंधारेंची खेडमधल्या सभेवर खोचक टीका; म्हणाल्या, “हा जोक ऑफ द डे!”
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांवर खोचक शब्दात टीका केली. “खेडमधील सभेत बोलताना रामदास कदमांनी ‘बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता’, असं विधान केलं. मात्र, वाघ कसा पाळला जाईल? रामदास कदम एकीकडे स्वत:ला वाघ म्हणतात आणि दुसरीकडे म्हणतात, मला बाळासाहेबांना पाळलं. पण वाघ कोणी पाळत नाही, लोक कुत्री, मांजर, शेळ्या, मेंढ्या आणि पोपट पाळतात. महत्त्वाचे म्हणजे वाघ कधीच रडत नसतो. पण हे फक्त झंडूबाम लावून रडत असतात”, असे त्या म्हणाल्या.
“असला रडका वाघ कुठून आला?”
“ईडी-सीबीआय-इलेक्शन कमिशन-हजारो ट्रोलर्स एवढा रोज मारा होतोय. तरी न डगमगता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जंगजंग पछाडत आहेत. ते झंडूबाम लावून रडत नाहीत. असला रडका वाघ कुठून आला? आम्हाला कळलं नाही. ते कोण आहेत ते त्यांचं त्यांनी ठरवावं. आम्ही लोकांवर टीका-टिप्पणी करण्यात आमचा वेळ घालवत नाही. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण. आमच्यासाठी महाराष्ट्राचे प्रश्न ऐरणीवर आणणं जास्त महत्त्वाचं आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांनीही केलं लक्ष्य
पुढे बोलताना त्यांनी अनिक्षा जयसिंघानिया प्रकरणावरून फडणवीसांनाही लक्ष्य केलं. “देवंद्रभाऊ, हे नेमकं काय चाललंय? एकनाथ शिंदेंच्या सोशल मीडिया पेजवरून लोक काहीतरी लिहीत आहेत की देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा कुठलातरी आर्थिक व्यवहार आहे. त्याच्या काही व्हिडीओ क्लिप आहेत. नेमकं हे खरं की खोटं? काय प्रकरण आहे? या सगळ्या कंड्या एकनाथ शिंदेंच्या लोकांकडून का पिकवल्या जात आहेत?” अशी टीका त्यांनी केली.
एकनाथ शिंदेंना लगावला टोला
दरम्यान, ‘मी गद्दार नाही, खुद्दार आहे’ असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडमधील सभेत बोलताना केले होते. यावरूनही सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. “एकनाथ शिंदेंनी असं म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे. गेल्या १० वर्षांत हा अत्यंत सुंदर आणि चांगल्या दर्जाचा विनोद आहे”, असा टोला त्यांनी लगावला. तसेच “एकनाथभाऊ डायलॉग खूप मारतात. पण त्यांचा स्क्रिप्टरायटर त्यांनी बदलायची गरज आहे”, असेही त्या म्हणाल्या.