१८ व्या लोकसभेचा निकाल आज जाहीर होत असून, राज्यातील सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. अनेक ठिकाणी अगदी काही हजार मतांच्या फरकाने उमेदवारांचा विजय होईल, असा अंदाज बांधल्या जात होता. तसेच, पक्षफुटी, बंडखोरी, मराठा, ओबीसी आरक्षण या प्रश्नांचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतो होती. निकालांपूर्वी झालेल्या एक्झिट पोल्समध्ये जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे समोर आले होते. आज राज्यातील अनेक जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार महायुतीच्या उमेदवारांना चुरशीची लढत देत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी झी २४ तासशी बोलताना सध्याच्या कलांवर आपली प्रतिक्रिया दिली.
अजून निकाल बाकी आहे. मला अनेक जागांवर अपेक्षा आहे. आशादायी आहे. लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही, त्यांना पारदर्शक राजकारण आवडतं. हा फटका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे बसला आहे. आणि देवेंद्र फडवीस पुन्हा कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाही, ते येतील पण विरोधी बाकावर बसतील, असे विधान सुषमा अंधारे यांनी केले.
मी राज्यभर फिरले, राहुल गांधींच्या यात्रेचा परिणाम दिसतोय. कापूस, सोयाबीन, महिलांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, महागाई, महिलांच्या समस्या. उत्तप्रदेशातील जागा पाहून आश्चर्य वाटते. हे सर्व चित्र आशादायी आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच, असली नकली शिवसेनाबाबत बोलताना, “बाप बाप होता है”, अशी प्रतिक्रिया देखील सुषमा अंधारे यांनी दिली.
बहुमतापासून दूरच
भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही सध्याच्या कलांवरून बहुमतापासून दूरच दिसून येत आहे. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९२ जागांवर तर इंडिया आघाडीला २३२ जागांवर यश मिळाल्याचे चित्र आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे गेल्या दोन निवडणुकीच्या अगदी उलट आहे.