महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज १९ मार्च रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवरून राज ठाकरे महायुतीत सामील होण्याची चिन्हे आहेत. या बैठकीत काय ठरलं हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. परंतु, यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे आणि भाजपावर टीका केली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जातेय. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “कल्याण लोकसभेच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी ज्या अपेक्षा केल्या आहेत त्यांचा आदर करते. परंतु, मी कोणत्याही जागेसाठी इच्छुक नाही. कल्याण लोकसभेचा उमेदवार २-३ दिवसांत निश्चित कळेल.”

हेही वाचा >> दिल्ली दौऱ्यानंतर राज ठाकरे मुंबईत परतले, बैठकीत काय ठरलं? बाळा नांदगावकर म्हणाले, “जी मागणी केली…”

राज ठाकरेंनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीबाबत अंधारे म्हणाल्या, “राज ठाकरेंनी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपाकडे स्वतःचे नेते शिल्लक राहिलेले नाहीत. फडणवीसांनी एक एक करून त्यांचे सर्व नेते संपवले आहेत. त्यामुळे भाजपाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून नेते आयात करावे लागत आहेत. ठिगळ्या ठिगळ्यांची गोधडी म्हणजे भाजपा असं म्हणावं लागेल”, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा >> मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर, तर आश्विनी भिडेंचीही ‘या’ जागेवर बदली

“उद्धव ठाकरे मातोश्रीवर असायचे आणि स्वतः मोदी मातोश्रीवर येऊन बोलणी करायचे. हा फरक आहे. पण इथल्या लोकांना दिल्लीत जाऊन कुर्निसात करावा लागतो”, अशीही टीका अंधारेंनी केली.

पवारांनी साताऱ्यातून निवडणूक लढवावी का?

पवारसाहेब कुठेही उभे राहिले तरी निवडूनच येणार आहे. त्यांचा विजय सदासर्वकाळ आहे. महाविकास आघाडीतील ते ज्येष्ठ नेते आहेत. पवारांनी पुण्यातून लढण्याला काहीच हरकत नाही. परंतु, निर्णय काय घ्यायचा हे सर्वथा तेच ठरवलीत. कारण ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना सुचवावं तेवढे आम्ही मोठे नाही”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare criticizes raj thackerays joining with bjp sgk