राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यानंर ४० दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. पहिल्या टप्यात शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप असलेले शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाल्यामुळे शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. तर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील राठोडांना मंत्रिपद दिल्यामुळे आक्षेप नोंदवला आहे. राठोड आता मंत्री असले तरी मी माझी लढाई सुरूच ठेवणार आहे, असे वाघ म्हणाल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वाघ यांना लक्ष्य केले आहे. पूजा चव्हाण या तरुणीला न्याय देण्यासाठी लढाई लढायची असेल तर निषेध म्हणून वाघ यांनी भाजपा पदाधिकारीपदाचा राजीनामा द्यावा, असे अंधारे म्हणाल्या आहेत.
हेही वाचा >> सत्ताकारण : महाराष्ट्रात ‘शतप्रतिशत’चा भाजपाचा प्रयत्न, शिंदे गटाशी युती करून डोळे २०२४च्या निवडणुकीवर!
“पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील आरोपी असणारे आमदार संजय राठोड यांच्याविरोधात भाजपाने रान पेटवले होते. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तर राठोड यांना चपलेने मारण्याची भाषा केली होती. त्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला. त्याच संजय राठोड यांना आता मंत्रिमंडळात सामील करून घेणे चमत्कारिक आहे. भाजपाकडे कोणती लाँड्री आहे? भाजपात एखादा नेता लाँड्रीच्या बाहेर आला की तो स्वच्छ दिसायला लागतो,” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
हेही वाचा >> “बदनामी करणाऱ्यांना समोर…” मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सत्तारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
“चित्रा वाघ यांनी आमची लढाई सुरूच राहील, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांना ही लढाई लढायची असेल तर त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून भाजपाच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तसेच चित्रा वाघ यांचा आदर्श घेत किरीट सोमय्या यांनीदेखील त्यांनी ज्या नेत्यांवर आरोप केले होते, ती लढाई सुरू ठेवली पाहिजे. असे झाले तरच भाजपाला सत्याची चाड आहे असे आम्ही म्हणू. अन्यथा हा फक्त सत्तातूर फितुरांचा खेळ असेल,” अशी खोचक टीका अंधारे यांनी चित्रा वाघ आणि किरीट सोमय्या यांच्यावर केली आहे.
दरम्यान, राजभवानमध्ये पार पडलेल्या मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना नव्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. मात्र या यादीमध्ये शिंदे गट तसेच भाजपाकडूनही एकही महिला मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही.