सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना केली होती. मात्र, आता त्यांना ही टीका भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. अंधारे यांनी स्वत: ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली.
हेही वाचा – “आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसचं समर्थन, शिवसेना आता का गळे काढतेय?” मनसेचा उद्धव ठाकरेंना सवाल
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
संजय शिरसाट या विकृत आमदाराने वापरलेली भाषा ही व्यक्तीशः मलाच नाही, तर एकूणच महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न करणारी आहे. तसेच त्यांची भाषा बहीण- भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. तसेच यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्याने मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते?
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत.” असे ते म्हणाले होते.