Sushma Andhare Mimicry of Amruta Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांची धामधूम सुरू आहे. आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पण्यांना उत आलाय. जुने संदर्भ शोधून काढत टीका केली जातेय. तर, जुन्या वाक्यांचा संदर्भ घेत नक्कलही केली जातेय. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची नक्कल केली आहे. भरसभेत त्यांना माझी लाडकी भावजयी असं म्हणत त्यांची नक्कल केली. वडाळा विधानसभा मतदारसंघातून श्रध्दा जाधव यांच्या प्रचारार्थ त्या बोलत होत्या.
२०२२ मध्ये झालेल्या बंडाबाबत सुषमा अंधारे बोलत होत्या. त्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोणत्या विवंचनेत होत्या याबाबत सुषमा अंधारे सांगत होत्या. त्या म्हणाल्या, “मणक्याच्या विकाराने उद्धव ठाकरे त्रस्त होते. मृत्यूशय्येवर होते. मृत्यूशी झुंज देत होते. रश्मी वहिनींच्या डोळ्यात चिंतेचे काहूर होते. चिंताग्रस्त रश्मी वहिनींना विरोधक, सत्ताधारी, विरोधक यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. आपला नवरा, आपलं सौभाग्य, आपलं कुंकू अडचणीत आहे, आपलं सौभाग्य मृत्यूशय्येवर आहे आणि ते सुखरूप परत आले पाहिजेत एवढीच त्या माऊलीची अपेक्षा होती. पण त्याच वेळेला मुख्यमंत्री पदाचा कारभार कोणी पाहायचा? साहेबांवर एवढी कठीण शस्त्रक्रिया होणार आहे. करायचं काय? आदित्य दादांनी आमदारांची बैठक बोलावली आणि एकनाथ शिंदेना गटनेता ठरवलं. ”
हेही वाचा >> Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कावळ्याच्या हाती दिला कारभार….
“एकनाथ शिंदे कधीकाळी शाखाप्रमुख म्हणून आले होते, मग जिल्हाप्रमुख झाले, महापौर झाले, आमदार झाले, मंत्री झाले पुढे नगरविकास मंत्री झाले. हे का सांगावं लागतं? त्याचं कारण आहे. एकनाथ शिंदे पाच दिवसांपूर्वी भाषणात म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला हलक्यात घेतलं, म्हणून त्यांचं सरकार पाडलं. फारच हलक्यात घेतलं. एकनाथ शिदेंसारखा माणूस एवढा पाताळयंत्री निघेल असं वाटलंच नसेल उद्धव ठाकरेंना. पाठीत खंजीर खुपसणारा निघेल असं वाटलंच नाही. पोटात पाप असतं तर उद्धव ठाकरेंनी कधीच त्यांना गटनेता बनवलं नसतं. आदित्य ठाकरेंकडे कारभार दिला असता. पण पुन्हा गावाकडेची म्हण आठवते. कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्याने हागून ठेवला दरबार”, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.
भाजपाबरोबर मांडवली केली
“आपला नेता मृत्यूशय्येवर असताना त्याच्या पश्चात या राज्याचा कारभार दिला. पण त्यांनी भाजपाची मांडवली करत गद्दारी केली. जे लोक म्हणतात आम्ही बंड, उठाव केला. बंड आणि उठाव करायचा असता तर ४० जण बाजूला गेले असते आणि पत्रकार परिषद घेतली. पण तुम्ही तोंड लपवून सुरतवाटे गुवाहाटीला गेलात, याचा अर्थ तुमच्या पोटात पाप होतं. आणि ते तोंड लपवून जाताना त्यांना मदत कोण करत होतं? देवेंद्र फडणवीस”, असंही त्या म्हणाल्या.
“हे आपण नाही बोललो, हे कोण बोललं? माझी प्रिय भावजयी, माझी लाडकी भावजयी म्हणाली. अमृता वहिनी म्हणाल्या, देवेंद्र असा हुडी-बुडी घालून जायचा. गॉगल बिगल लावून जायचा. रात्रीच्या अंधारात अंथरातून उठून जायचा. रात्रीचा जातोस गुपचूप. देवेंद्र कुठे जायचा मला कळायचाच नाही. आमच्या भावजयीने सांगितलं. रात्रीच्या अंधारात कोण जातो?”असं म्हणत सुषमा अंधारेंनी अमृता फडणवीसांची नक्कल करत देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंवरही टीका केली.