ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘फडतूस’ केल्याप्रकरणी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी शिंदे गटाच्या महिला नेत्यांवर कोणतीच कारवाई न केल्याने उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलाय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावरून भाजपा नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचा उल्लेख ‘भक्तगण’ असा करत तुफान टोलेबाजी केली. जेव्हा भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान होत होता, त्यावेळी कार्यकर्ते चेकाळले नाहीत. पण फडतूस शब्दावर भक्तगण चेकाळले, अशी टोलेबाजी सुषमा अंधारे यांनी केली. त्या रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी काढलेल्या मोर्चात बोलत होत्या.
हेही वाचा- “…अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा!
यावेळी सुषमा अंधारे भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्देशून तीन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी कोणतीच कारवाई झाली नाही, म्हणून उद्धव ठाकरेंनी उद्वविगतेनं ‘फडतूस’ शब्द उच्चारला. तेव्हा भक्तगण प्रचंड चेकाळले आणि चौथाळले. पण त्या भक्तगणांनी जरा विचार करावा, जेव्हा मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड किंवा भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरली. त्यावेळी भक्तगणांना राग का आला नाही? शिवराय तुमचे दैवत नाहीत का?”
हेही वाचा- “हिंमत असेल तर ४८ तासांत मातोश्रीवर या”, ‘त्या’ विधानावरुन सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं आव्हान
दुसरा प्रश्न विचारताना सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “जेव्हा चंद्रकांत पाटलांनी अगदी सहजपणे कर्मवीर भाऊराव पाटील आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत छिछोर भाषा वापरली. तेव्हाही भक्तांना राग आला नाही. बाबासाहेब तुमचं दैवत नाहीत का? उत्तर द्या. आता जरा तिसऱ्या प्रश्नावर येऊयात… काल-परवा जेव्हा संभाजीनगरमध्ये ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. तेव्हा काही छिछोर भक्तांनी त्या मैदानावर गोमूत्र शिंपडलं. ज्या मैदानावर आमच्या मुस्लीम भावंडांनी रोझा सोडला. ज्या मैदानावर अठरा पगड जातीचे लोक आले होते. तिथल्या मैदानावर जर तुम्ही गौमूत्र शिंपडत असाल तर हा सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांचा अपमान नाही का? पण यावरही भक्तगण चेकाळले नाहीत. मात्र ‘फडतूस’ शब्दांवर भक्तगण प्रचंड चेकाळले. म्हणजे तुम्हीच विचार करा, भक्तांचा चॉईसही किती फडतूस आहे.”