बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळाव्यात संबोधित करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची एक ऑडिओ क्लीप लावली. महाविकास आघाडीचे सरकार असताना वीजबिल माफ करा, अशी मागणी फडणवीसांनी केली होती. ती क्लीप लावून आता शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवसींना दिलं होतं.

त्याला देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “महावितरणने पहिल्यांदाच असं पत्र काढलं की फक्त सध्याचं चालू वीजबिल घ्यायचं. थकित बिलाची मागणी करायची नाही. त्यामुळे वीजबिलाच्या मुद्द्यावरून बोलणाऱ्यांनी ‘जनाची नाहीतर मनाची लाज बाळगली पाहिजे’,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

“वीजबिल माफ करू असं मी कधीच म्हटलं नाही. करोना काळात मध्यप्रदेश सरकारने वीजबिल स्थगित करुन नंतर माफ केलं. तोच पॅटर्न महाराष्ट्राने राबवावा, अशी मागणी केली होती. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एक रुपयाचीही सूट शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वीजबिल प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही,” असं फडणवीस यांनी खडसावलं.

यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. “देवेंद्रभाऊ यांचं असं झालं की, ‘हम करे तो रासलीला आणि लोक करे तो कॅरेक्टर ढिला’. देवेंद्र फडणवीस जे करतात ते योग्य आणि दुसरे करतात ते अयोग्य हे पटवून देण्यात ते हुशार आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेशाच्या कार्यकाळातील वीजबिल आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिका याचा आलेख मांडण्याची माझी तयारी आहे,” असे आव्हान सुषमा अंधारेंनी दिलं आहे.