महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल १५ मे पूर्वी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सूचक विधान केलं आहे. ११ ते १३ मे च्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला, तरी आश्चर्य वाटू नये, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांना भेटायला जाणं, गुजरातमधील वर्तमानपत्रात बातमी येणं किंवा दिल्लीश्वरांनी तातडीने बोलावणं, आतापर्यंत कधीही पाहिलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांची रजा घेतली. या तीन दिवसांमध्ये सलग पूजा होती म्हणे… पूजा वगैरे कशासाठी होत आहेत, याचा अर्थ लावा… पण, ११ ते १३ मे दरम्यान बरचसे चित्र स्पष्ट झालेलं असेल,” असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.

हेही वाचा : “प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत भाजपाला…”, उद्धव ठाकरेंचं विधान

“देवेंद्र फडणवीसांनी जिवाचा आटापिटा केला असून, पुन्हा येण्यासाठी आताही करत आहेत. पण, दिल्लीश्वरांनी त्यांना तंबी दिली आहे. आता बास… कारण, फडणवीसांच्या सर्व उठाठेवीमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. विधानपरिषद निवडणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत तर ‘बाजार’च उठला आहे,” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.

हेही वाचा : “सुक्ष्म माणसावर…”, उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर मिश्कील टिप्पणी

“येणाऱ्या काळात शिंदेंचा हात धरणे कितपत आपल्याला हिताचे ठरेल, याबद्दल भाजपालाच शंका आहे. त्यामुळे ११ ते १३ मे च्या काळात निश्चितपणे देवेंद्र फडणवीसांना धक्का लागला, तरीसुद्धा आश्चर्य वाटू नये,” असेही सुषमा अंधारेंनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare on devendra fadnavis over supreme court shinde thackeray case ssa