शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांनी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बळकावण्याच्या प्रयत्नांवरून एकनाथ शिंदेवर टीकास्र सोडलं आहे.
यावेळी सुषमा अंधारे एका घटनेचा उल्लेख करत म्हणाल्या, “साधारत: दीड ते दोन महिन्यांपूर्वी एका माणसावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटक झाली होती. ते केवळ एकनाथभाऊंसारखे दिसतात, हाच त्याचा गुन्हा होता. त्याला एकनाथभाऊंसारखी दाडी आहे… मिशा आहे…. चष्मा आहे…, तो एकनाथ भाऊंसारखा फोटो काढतो, म्हणून त्याच्यावर कारवाई झाली. संबंधित व्यक्ती आमचं नाव आणि चेहऱ्याचा दुरुपयोग करत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या गरीब माणसावर कारवाई केली.
हेही वाचा- “बायकांना बोलल्यावर देवेंद्रभाऊंना जणूकाही…” सुषमा अंधारेंचं फडणवीसांसह गुलाबराव पाटलांवर टीकास्र
“त्याच्यावर कारवाई करणारे आमचे एकनाथभाऊ होते. पण भाऊ तुम्ही काय केलं? भाऊ तुम्ही आमच्या शिवसेनेचे चेहरा घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शिवसेनेचं नाव घेण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखा दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखं सेनाभवन बांधण्याचा प्रयत्न केला. मग भाऊ तुमच्यावर कोणती कारवाई करायला हवी? हे सांगा ना…” असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला.
हेही वाचा- “नारायण राणेंची दोन बारकी-बारकी पोरं…” भलताच उल्लेख करत सुषमा अंधारेंची टोलेबाजी!
अंधारे पुढे म्हणाल्या, “तुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती गरीब होती, म्हणून तुम्ही त्याला तुरुंगात टाकलं. पण आता तुमचं काय करायचं भाऊ… अब तेरा क्या होगा कालिया? हे तर विचारावं लागेल ना? तुम्ही आरे म्हणाला तर आम्ही कारे म्हणू… आम्ही कारे नाही म्हटलं तर आम्ही शिवसैनिक कसले? आम्ही बिलकूल आरे ला कारे म्हणणार… तुम्ही दोन मजली नव्हे, तर दहा मजली सेनाभवन बांधू शकता, त्याला संगमरवराने सजवू शकता… पण त्याला जे अधिष्ठान हवं असतं, ते अधिष्ठान तुमच्या सेनाभवनाला मिळेलं का?” असा सवालही अंधारे यांनी विचारला.