ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी केलं. संजय राऊतांच्या या विधानाचे विधानसभेत पडसाद उमटले. सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाने संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेतला. तसेच संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करा, अशी मागणी भाजपाच्या काही सदस्यांनी केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहातील कामकाज तहकूब केलं.
दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहातच संजय राऊत यांना धमकी दिली आहे. “संजय राऊतांचं संरक्षण १० मिनिटांसाठी काढा, ते परत दिसणार नाहीत” असं विधान नितेश राणे यांनी केलं. नितेश राणेंच्या या विधानाची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. बारक्या बारक्या लेकरांचं मनावर घ्यायचं नाही, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं. त्या वाशिम येथे पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
हेही वाचा- “संजय राऊत डाकू आहे डाकू, त्याच्यावर…”, थेट शिवी देत संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया
नितेश राणेंच्या विधानाबाबत विचारलं असता सुषमा अंधारे म्हणाल्या, “जाऊ द्या हो… कुठं बारक्या बारक्या लेकरांचं आपण मनावर घ्यायचं. आपण त्यांच्याबद्दल एवढा गंभीर विचार करायचा नाही. लहान लेकरू आहे, बोलत असतंय. आपण त्याचं कौतुक करायचं. आपण लाडाने त्याला थोडंसं चुचकारायचं… गोंजरायचं.”
हेही वाचा- “…हा उद्धव ठाकरेंच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का”, रामदास आठवलेंचं थेट विधान
“अडचण काय आहे माहीत आहे का? काही लेकरांना सतत लक्ष वेधून घ्यायची सवय असते. त्यामुळे नारायणरावांची जी बारकी बारकी लेकरं आहेत, त्यांची अडचण अशी झाली आहे की, भाजपा त्यांच्याकडे काहीही केल्याने लक्षच देत नाहीये. त्यामुळे इकडे आमच्या नवनीत अक्का हातपाय आपटतात. तिकडे आमचे हे दोन भाचे (नितेश राणे व निलेश राणे) हातपाय आपटतात. त्यामुळे मला वाटतंय की, या लहान लहान लेकरांवरती मी अजिबात रागवायला नको. लहान लहान लेकरं आहेत, त्यांना बोलू द्या…” अशी तुफान टोलेबाजी सुषमा अंधारेंनी केली आहे.