मागील काही दिवसांपासून राज्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि वंचित बहुजन आघाडीबरोबर युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानी भेट दिली. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांची ही भेट झाली. यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी खोचक टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात १५ मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. ही चर्चा गुलदस्त्यात असल्याने वंचित आघाडी आणि शिंदे गट एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया देत, “दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय,” असे म्हटलं आहे.
तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर सुद्धा सुषमा अंधारेंनी भाष्य केलं आहे. “२० नोव्हेंबरला प्रबोधन डॉट कॉम या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. ही भेट राजकीय नाही. वंचित बहुजन आघाडीचा युतीसाठी प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यास उद्धव ठाकरे त्यावर निर्णय घेतील,” असेही सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं.