एकनाथ शिंदे यांनी एक वर्षापूर्वी शिवसेनेत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यानंतर अजित पवार यांनी ९ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. आता शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. यावर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी सुषमा अंधारेंनी संवाद साधला. सुषमा अंधारे म्हणाल्या, “पाण्यात काठी मारली म्हणून पाणी विभागलं जात नाही. नाती आणि ऋणानुबंध बोलण्याने तुटत नसतात. राजकीय दृष्ट्या काही मागणी होत आहे. तेव्हा निश्चित कार्यकर्त्यांचं स्वागत केलं पाहिजे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांची ही इच्छा आहे.”
हेही वाचा : “…तेव्हा मास्टरस्ट्रोक काय असतात ते दाखवू”, संजय राऊतांचा भाजपाला इशारा
“फसवणूक करून गेलेल्या लोकांना अजूनही मी भाऊ म्हणते. मग, जिथे रक्तांचे भाऊ आहेत, त्यांच्याबद्दल माझी काय भूमिका असू शकते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजेत. पण, हा प्रश्न नेतृत्वाच्या पातळीचा आहे. राज ठाकरे किंवा अन्य कोणी यावर भाष्य करत नाही. तोपर्यंत भाष्य करणं उचित नसेल,” असं सुषमा अंधारेंनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : VIDEO : राष्ट्रवादी काँग्रेसला किती आमदारांचा पाठिंबा? जयंत पाटील स्पष्टीकरण देत म्हणाले, “५३ पैकी…”
सुषमा अंधारेंनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टोलेबाजी केली आहे. “इतका अट्टहास करत तीन वेळा सरकार पाडून पहाटे, दुपार आणि संध्याकाळचे सगळे मुहूर्त शोधले. तरी, देवेंद्र फडणवीसांच्या हाती काहीच लागले नाही. अर्थखात्यासाठी सरकारमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार चांगल्या पद्धतीने अर्थखाते सांभाळू शकतील. पण, अजित पवारांच्या हातात अर्थखाते गेल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या हाती काय उरणार? कदाचित विस्थापित करण्याची पूर्ण खेळी केंद्रातील भाजपाने केल्याची शंका आहे,” असा टोलाही अंधारेंनी फडणवीसांना लगावला आहे.