महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण करणे शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच भोवल्याचं दिसत आहे. कारण, शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी कायद्याची भाषा केली आहे.
ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महाप्रबोधन यात्रा मेळावा पार पडला. या जाहीर मेळाव्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलीन केली. अन्य नेत्यांबद्दलही अवमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागाप्रमुख बाळा गवस यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
“माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी…”
यावरती बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं, “जो कोणी सत्य बोलेल त्याला भीती दाखवली जाते, त्यामुळे धक्का बसण्यासारखं काही नाही. मोदीजींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असेल, तर ती नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. देशात प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगार आहोत.”
“नोटीसीला कायदेशीर उत्तर…”
“मला अद्यापही पोलिसांची कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही. मिळाली तर पोलीस ठाण्यात हजर होईल. कारण, कायदा माझ्या बापाने लिहला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कोणी करायचा. त्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल,” असेही अंधारे यांनी स्पष्ट केलं.