आधी लोकसभेची आणि त्यानंतर राज्यसभेची उमदेवारी नाकारल्यानंतर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तसेच ते पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारी असून ते लवकरच उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करतील, असंही बोललं जात आहे. दरम्यान, या चर्चांवर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे यांनी आज टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या तसेच उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांवर भाष्य केलं. तसेच त्यांनी राजीमान्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
हेही वाचा – “छगन भुजबळ पक्ष सोडणार, त्यांच्याबरोबर…”, रोहित पवारांचा दावा; पक्षांतराची वेळही सांगितली
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
छगन भुजबळ हे शिवसेनेत येतील, अशी कोणतीही चर्चा माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. मात्र, छगन भुजबळ हे सक्षम नेते आहेत. जेंव्हा कधी त्यांना निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा ते ठामपणे निर्णय घेतील. पत्रकार परिषदेला सामोरे जातील आणि त्यांचा निर्णय ते जाहीर करतील, छगन भुजबळ हे व्हाया सुरत गुवाहाटी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीत, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांनीही केलं लक्ष्य
पुढे बोलताना त्यांनी राजीनामा देण्याच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस केवळ नौटंकी करत आहेत. जर त्यांना खरंच पदाची आसक्ती नसेल तर त्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला असता. त्यांच्याकडून केवळ दबाबतंत्राचा वापर केला जातो आहे, मात्र, भाजपाचे केंद्रातले नेते अशाप्रकारे दबावाला बळी पडत नाही, जर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यायचाच असेल, तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा – बच्चू कडूंचं वक्तव्य, “मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकत्र आलं पाहिजे, कारण..”
छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण काय?
दरम्यान, नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं असून आपण नाराज नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. माझ्या विषयी ज्या विविध चर्चा केल्या जात आहेत त्यामध्ये तथ्य़ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि कायमच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहे. मी नाराज आहे, दुसऱ्या नेत्यांना भेटलो आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांची भेट घेतली या सगळ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. तसंच माझ्या नाराजीच्या चर्चा साफ खोट्या आहेत.” असं छगन भुजबळ म्हणाले.