दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केली. यानंतर सरकारने याबाबत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यावर ठाकरे गटासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. दिशा सालियान यांच्या मृत्यूप्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करायची असेल तर जरूर करा. पण न्यायमूर्ती लोया आणि अनिक्षा जयसिंगानी, अमृता फडणवीस याप्रकरणातही एसआयटी गठीत करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचं ट्विटर) पोस्ट लिहून ही मागणी केली.
संबंधित पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या, “सीबीआयने दिशा सालियान प्रकरणात ‘अपघाती मृत्यू’ झाल्याचा निर्वाळा दिल्यानंतर ही एसआयटी नेमायची असेल तर नक्की नेमा. कर नाही त्याला डर कसली. पण सोबतच एक एसआयटी न्यायमूर्ती लोया आणि अनिक्षा जयसिंगानी, अमृता फडणवीस यांच्या प्रकरणातही नेमली जावी, एवढी माफक अपेक्षा आहे.”