माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यांनी पेंढापूर येथे शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. दरम्यान, त्यांनी ओल्या दुष्काळाचीही पाहणीही केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून आता राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. शिंदे गटातील काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून खोचक टीका केली आहे. या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारेंनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, प्रसारमाध्यमांमध्ये काय चर्चा झाली? हे मला खरंच माहीत नाही. कुणी काय विधानं केली, हेही मला माहीत नाही. पण ज्याअर्थी आपण यावर प्रश्न विचारताय त्यावरून एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. ज्या-ज्या वेळी गरज असेल, तेव्हा तिथे जाऊन उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात दौरे केले आहेत. मग तो वादळ परिस्थितीचा दौरा असेल किंवा पूर परिस्थितीचा दौरा किंवा आजचा त्यांचा औरंगाबादचा दौरा असेल. त्यांनी संकटकालीन परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येकवेळी दौरे केले आहेत.
“औरंगाबाद दौऱ्यावरून काही लोकांना त्यांच्या सवयीप्रमाणे खोचक टिप्पणी करणं सुचत आहे. अशा लोकांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, सेनापतीचं काम केवळ परिस्थिती नियंत्रित करणं, निर्देश देणं आणि सैनिकांकडून काम करून घेण्याचं असतं. पण जेव्हा सैनिक कामचुकारपणा करतात, सैनिक अविश्वासू पद्धतीने वागतात. तसेच ते सेनापतीच्या शारीरिक परिस्थितीचा गैरफायदा घेतात. अशावेळी सैनिकांवरील विश्वास सार्थ न ठरल्यामुळे सेनापती स्वत: मैदानात उतरतात” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.